डर्टी’ आरोपांच्या ना वा वर सहकार्याकडूनउकळली खंडणी : कुलगुरू, राज्यपालांकडे तक्रार
डर्टी’ आरोपांच्या ना वा वर सहकार्याकडूनउकळली खंडणी : कुलगुरू, राज्यपालांकडे तक्रार.
---------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नागपूर. माधुरी पांडे
----------------------------------------------------------
वेगवेगळ्या प्रकरणांमुळे चर्चेत राहणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नवीनच ‘भानगड’ समोर आली आहे. विद्यार्थिनींकडून ‘डर्टी’ तक्रारी करण्यात आल्याच बनाव रचून विद्यापीठातील प्रभारी जनसंपर्क अधिकारी आणि जनसंवाद विभागाचे प्राध्यापक धर्मेश धवनकर (Professor Dharmesh Dhavankar) यांनी सहकारी प्राध्यापकांकडूनच खंडणी (Extortion) उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. सात प्राध्यपकांनी कुलगुरू, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. तक्रारीत सातही प्राध्यापकांकडून एकूण १५.५० लाख रुपये उकळले असल्याचे नमुद आहे. या तक्रारीनंतर विद्यापीठाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विद्यापीठात सध्या सीनेट निवडणुकांच्या निमित्ताने वातावरण तापले आहे. त्यातच नव्या भानगडीची भर पडली आहे. सात दिवसांपूर्वीच प्राध्यापकांनी तक्रार केल्याचे शनिवारी समोर आले. तुर्त या प्रकरणावर साऱ्यांनीच मौन बाळगले आहे. पण, येणाऱ्या काळात काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकप्रशासन विभागाचे प्रमूख डॉ. जितेंद्र वासनिक, प्रवास व पर्यटन विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक बोरकर, ग्रंथालयशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सत्यप्रकाश निकोसे, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सत्यप्रकाश इंदुरवाडे, जीवरसायन विभागप्रमुख डॉ. विरेंद्र मेश्राम, मराठी प्रभारी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांना तक्रार केली आहे. तक्रारीनुसार धवनकर यांनी तुमच्या विभागातील काही मुलींनी तुमच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीवर लिगल सेलची तथ्थशोधन समिती गठीत करण्यात आली असून त्यात दोन वकील आणि मीसुद्धा असल्याचे सांगितले. हे दोन्हा वकील माझे मित्र असून तुम्हाला या प्रकरणातून मी बाहेर काढतो असे सांगितले. यावेळी त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल, त्यांना पैसे द्यावे लागेल असे सांगितले.
शिवाय या तक्रारीवरुन त्यांच्या मनात भिती निर्माण करीत, त्याची कुठेही वाच्यता केल्यास संपूर्ण प्रकरण बिघडेल असेही सांगितले. यावेळी त्यांनी प्राध्यापकांना वर्तमानपत्रात बातमी छापून बदनामी करण्याचीही धमकी दिली. यापूर्वी हिंदी विभागप्रमुखाविरोधात अशी तक्रार असल्याने नाहक बदनामी होईल या भितीने पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार त्यांनी प्रत्येक प्राध्यापकाला १० लाखाची मागणी केली. मात्र चर्चेअंती काहींना सात तर काहींनी पाच लाख देण्याचे ठरविले. मिळणाऱ्या रकमेपैकी २ लाख ज्युनिअर तर ५ लाख वरिष्ठ वकिलाला द्यावे लागणार असल्याचे सांगितले होते. बदनामी होऊ नये यासाठी प्राध्यापकांनी एकूण १५ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतरही त्यांनी सातत्याने प्रकरण पुन्हा बाहेर निघण्याची धमकी देत पैसे मागितले. मात्र, काहीच केले नसताना केवळ तक्रारी दाखल असल्याची बतावणी करीत त्यांनी फसवणूक केल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरूंकडे ४ नोव्हेंबरला केली आहे.
Comments
Post a Comment