'नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा नागपूरला २८ नोव्हेंबर रोजी प्रयोग नरहर कुरुंदकरांच्या जीवन-विचाराचे दर्शन घडविणारे अभिनव नाटक.
'नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा नागपूरला २८ नोव्हेंबर रोजी प्रयोग नरहर कुरुंदकरांच्या जीवन-विचाराचे दर्शन घडविणारे अभिनव नाटक.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नागपूर प्रतिनिधी
---------------------------------
नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत 'नरहर कुरुंदकर :एका विचारवंताची अपरिचित गोष्ट ' या साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे राम शेवाळकर प्रतिष्ठान आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान या संस्थांनी सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सायं. ६.३० वा. उत्तर अंबाझरी मार्गावरील श्री साई सभागृह, राष्ट्रभाषा संकुल येथे आयोजन केले आहे. स्थानिक कलाप्रेमींच्या सहकार्याने आयोजित या प्रयोगाला प्रवेश नि:शुल्क आहे.
मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथील यशस्वी प्रयोगानंतर या नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जवळपास वीस प्रयोग होत आहेत. त्यात पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर, लातूर. अंबाजोगाई, सेलू परभणी, हैदराबाद, आणि वरोरा येथील प्रयोगानंतर नागपूर येथे पहिला प्रयोग होत आहे.
अनोखे रंगमंचीय सादरीकरण
सुप्रसिद्ध विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे “नरहर कुरुंदकर – एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण आहे. नाटकाच्या संहितेच्या अभिवाचनाच्या अभिनव नाट्यप्रयोगात ज्येष्ठ अभिनेते दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, राजीव किवळेकर, बालकलाकार शुभंकर देशपांडे, लेखक-दिग्दर्शक अजय अंबेकर आणि सुप्रसिद्ध दूरदर्शन वृत्त निवेदिका ज्योती अंबेकर यांचा यात सहभाग आहे.
इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मूलगामी मते सडेतोडपणे मांडणा-या नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. पुरोगामी विचाराच्या मांडणीबरोबरच अनेक साहित्यिक, सांस्कृतिक संस्था उभारणीला त्यांनी मोठे पाठबळ दिले होते. विद्यार्थी घडविणे आणि मराठवाड्यातल्या व्यक्ती आणि संस्था यांना प्रोत्साहन देण्याची मोठी कामगिरी त्यांनी त्यावेळी केली. या सर्व पैलूंची अत्यंत रंजक मांडणी या प्रयोगात करण्यात आली आहे. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांचे आहे. या नाट्यप्रयोगाला रसिक आणि दर्दी प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने श्री. गिरीश गांधी आणि श्री. आशुतोष शेवाळकर, अनिल गडेकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment