मिरजकर आहे हे सांगण्याची खराब रस्त्यामुळे लाज वाटते;डॉ. रियाज मुजावर रस्त्याचे पाच कोटीचे प्रस्ताव मंजूर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे..
मिरजकर आहे हे सांगण्याची खराब रस्त्यामुळे लाज वाटते;डॉ. रियाज मुजावर रस्त्याचे पाच कोटीचे प्रस्ताव मंजूर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे.
-------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------
मिरज : मिरजेतील खराब रस्त्यामुळे मिरजकर आहे असे सांगण्याची आम्हास लाज वाटते असे मत हृदयरोग तज्ञ डॉ. रियाज मुजावर यांनी व्यक्त केले. ते रविवारी सकाळी महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ खराब रस्ता नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी सुधारावा या मागणीसाठी केलेल्या एक तासाच्या बैठ्या आंदोलनात बोलत होते. हे आंदोलन इंडियन मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन क्रिडाई, मिरज व्यापारी असोसिएशन, मिरज सराफी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी डॉ.अशोक पाटील यांच्याशी संपर्क साधून विविध कागदपत्रांचा संदर्भ देऊन पाच कोटीचे प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. पण टेंडरची मुदत ४५ दिवस असते त्यामुळे थोडा उशीर लागणार पण मिरजेतले सर्व रस्ते लवकरच चांगल्या स्थितीत दिसतील अशी त्यांनी खात्री दिली. याशिवाय ७५ कोटीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून त्यावर मुख्यमंत्र्यांची शेरा झाला आहे. अशी ही माहिती त्यांनी दिली. आम्ही सातत्याने कामात सक्रिय असतोच व मिरजेकडे आमचे दुर्लक्ष होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
रस्त्यावरून चालतो म्हणून त्याला रस्ता म्हणायचे का १०० फूट असा रस्ता दाखवा जो खराब नाही त्याला पाच पाच हजार रुपयांचे बक्षीस द्यायची तयारी आहे. लोकांचा किती अंत बघायचा हे ठरलं पाहिजे. आता सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन रस्त्याचा प्रश्न नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी सोडवला पाहिजे अशी मागणी जेष्ठ डॉक्टर बी. टी. कुरणे यांनी केली.
जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे माजी अध्यक्ष व आजच्या आंदोलनाचे निमंत्रक डॉ. अशोक पाटील म्हणाले की आम्ही हा एक सत्याग्रह केला आहे. महिन्याला चार-पाच रुग्ण येतात जे खराब रस्त्यामुळे पडलेले असतात. त्यांना टाके घालावे लागतात. त्यांच्याकडे पैसे मागायची ही आम्हास लाज वाटते कारण मिरजेच्या या खराब रस्त्याला आमची निष्क्रियता ही कारणीभूत आहे. मिरजेतील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन हा प्रश्न प्राधान्याने सर्वपक्षीय नेत्यांना सोडवण्यास भाग पाडले पाहिजे.
जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॉ. संदीप देवल म्हणाले की या खराब रस्त्यामुळे संपूर्ण धुळीचे साम्राज्य पसरले आहे. केवळ कंबरदुखीच नव्हे तर सर्दी आणि दमा या आजारानेही मिरजकर त्रस्त झालेले आहेत. आता राजकारण बाजूला ठेवून नागरिक म्हणून नेत्यांनी मिरजेतील रस्त्याचा प्रश्न सोडवावा.
मिरजेतील जेष्ठ डॉ. मुकुंद पाठक म्हणाले की मिरजेतून असा रस्ता दिसत नाही की जिथे ब्रेक आणि गिअर न बदलता दोन मिनिट गाडी चालवता येईल. खरोखरच रस्त्याची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. नागरिकांनी किती सहन करायचं यालाही मर्याद आहेत. तरी रस्ते त्वरित चांगले होणे गरजेचे आहे. याबाबतीत कारण सांगणं बंद झालं पाहिजे.
क्रीडाइ बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पटवर्धन म्हणाले की रस्ते बांधणे आणि त्याची देखभाल करणे हे जर मनात आणलं तर शक्य आहे. या एक दोन महिन्यात मिरजेतील रस्ते चांगले होऊ शकतात. त्यासाठी फक्त मानसिकतेची गरज आहे. प्रामाणिक प्रयत्नाची आवश्यकता आहे.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी या आंदोलनातील मान्यवरांना भेट दिली व त्यांनी स्पष्टीकरण देताना असे सांगितले की अमृत योजनेमुळे रस्त्याची थोडी दुर्दशा झाली आहे. परंतु बदललेल्या शासनामुळे राज्य सरकारकडून येणारा निधी थांबला तथापि पालकमंत्र्यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन निधीतून तसेच हॅम या योजनेतून येत्या दोन-चार महिन्यात मिरजेतील सर्व रस्ते चांगले करण्याचा कसोशीने प्रयत्न करू.
माझी महापौर संगीता ताई खोत म्हणाल्या की सांगलीला मोठा निधी मिळतो त्यावेळी मिरजेला निधी मिळवण्यासाठी आम्ही भांडतो. आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो तथापि अलीकडील काळात लवकरच यश मिळेल व मिरजेतील रस्ते चांगले होतील.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आमनापुरे म्हणाले की ही रस्त्याची हालत सुधारण्यासाठी नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत अन्यथा आम्हा सर्व डॉक्टर्सना गल्लीबोळात फिरून सर्व मिरजकरांना जागे करून तीव्र आंदोलन छेडावे लागेल.
या आंदोलनात असंख्य मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. सचिन घाडगे ,डॉ उदय कुलकर्णी ,डॉ. नौशाद इनामदार, डॉ.एन जी रोहिले, डॉ. नौशाद मोमीन, डॉ. सलीम चमनशेख, नाक कान घसा तज्ञ डॉ. अशोक पाटील , क्रीडाइ या बिल्डर्स असोसिएशनचे विनायक गोखले, आनंदराव माळी व संतोष आरवटगी, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे नितीन दुधाळ, इरफान सय्यद, व्यापारी असोसिएशनचे प्रमुख विराज कोकणे, ज्वेलर्स असोसिएशनचे प्रतिनिधी प्रसाद मदभावीकर, उद्योजक इंद्रजीत घाटे, अभिनव सामाजिक संस्थेचे प्रमुख आबासाहेब कागवाडे, व्यापारी रवी चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रमुख गणेश आवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आम्ही सातत्याने रस्ता सुधारण्याविषयी प्रयत्न करत असतोच व सातत्याने पाठपुरावा यापुढेही करत राहू असे अशी त्यांनी खात्री दिली. छायाचित्रकार सागर घाडगे व आदी पत्रकारांनी सक्रिय सहभाग घेतला.सूत्रसंचलन रवींद्र फडके यांनी केले.
Comments
Post a Comment