नव्या पिढीसाठी नवीन पद्धतीने साहित्य निर्मिती व्हावी.
नव्या पिढीसाठी नवीन पद्धतीने साहित्य निर्मिती व्हावी.
---------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
----------------------------------------------
राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
68 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उदघाटन
चंद्रपूर : अनेक हालपेष्टा सहन करून साहित्यिक पुस्तक लिहतो, त्याचं प्रकाशन होतं . मात्र, पुस्तक विकत घेणाऱ्यांची संख्या हल्ली कमी झाली, पर्यायाने वाचकांची संख्या घटते आहे. मग, साहित्य नव्या पिढीपर्यंत कसे पोहोचेल हा चिंतनाचा विषय असून बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा विचार करुन भविष्यात पुस्तके नवीन पद्धतीने यावीत, अशी अपेक्षा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे व्यक्त केली. 68 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वि. स. जोग, स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आमदार अभिजीत वंजारी, कुलगुरू वेदप्रकाश मिश्रा, ॲड फिरदौस मिर्झा, श्रीधर काळे, रवींद्र शोभणे, माजी आमदार सुदर्शन निमकर, श्रीराम कावळे, इको प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, प्रा. अशोक जीवतोडे, प्रशांत पोटदुखे, प्रदीप दाते, सुर्यांश चे अध्यक्ष इरफान शेख, माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित यांची मंचावर उपस्थित होते.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, चंद्रपूरचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजिरीतून क्रांती घडली. चिमूरच्या स्वातंत्र्याची घोषणा बर्लिनच्या आकाशवाणीवरून झाली. अशा चंद्रपूर जिल्ह्यात साहित्य संमेलन होत आहे, ही सौभाग्याची गोष्ट आहे ; साहित्य संमलेनातून विविध चर्चासत्राच्या माध्यमातून चिंतन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मानसिक प्रदूषण दूर करण्यासाठी साहित्य महत्वाचे ठरते. त्यासाठी विदर्भ साहित्य संघावर मोठी जबाबदारी आहे. भारतमातेच्या हृदयाच्या स्थानी असलेल्या विदर्भात साहित्याची धार निर्माण होईल. हे साहित्य संमेलन ऊर्जा देणारे केंद्र बनावे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात प्राचार्य मदन धनकर, डॉ. शरदचंद्र सलफले, डॉ. अशोक जीवतोडे, बंडू धोतरे यांचा समावेश होता.
प्रास्ताविक डॉ. प्रमोद काटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमा गोलवळकर यांनी केले.
Comments
Post a Comment