जाऊ संतांच्या गावा!
जाऊ संतांच्या गावा!
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
बार्शी प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------------------
संत गोरा कुंभार इ.स. १२६७ – १० एप्रिल १३१७ काळातील महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. संत गोरा कुंभार यांचा जन्म “तेर’ नगरीत झाला. गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. “तेर’ येथील “काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
गोरोबांचे वडील माधवबुवांना व आई रखुमाईं यांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली आठ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. एके दिवशी परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेष घेऊन त्यांचे घरी आले. तेव्हा या दाम्पत्याची खिन्न मुद्रा पाहून देवांनी त्यांना विचारले की, तुम्ही दुःखी का?’ माधबुवांनी सांगितले की,”आमची आठही मुले देवाने नेली म्हणून. नंतर देवाने आठ मुलांना जेथे मूठमाती दिली, ती जागा दाखविण्यास सांगितले. माधवबुवांनी त्यांना मुले पुरली ती जागा दाखविली. देवांनी सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितली. बुवांनी आठही मुलांची प्रेते बाहेर काढली. देवाने सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले व त्यांना स्वर्गात पाठविले आणि नंतर आठवा मुलगा जिवंत केला. तोही स्वर्गाच्या मार्गाने निघाला, परंतु देवाने त्यास जाऊ दिले नाही. भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुवा रखुमाईच्या स्वाधीन केले. देव म्हणाले, ‘याला गोरीतून काढले म्हणून याचे नाव गोरोबा ठेव.’
गोरोबांच्या मनावर लहानपणापासूनच भगवद्भक्तीचे संस्कार झाले होते. गोरोबांना लिहायला वाचायला येत होते. गोरोबा यांचा दिनक्रम प्रपंचातून परमार्थाकडे असे.
एके दिवशी गोरोबा पायाने चिखल तुडवित होते. त्यांचे सर्व ध्यान पांडुरंगचरणी लागलेले असे. गोरोबा जरी संसारात दंग होते तरी विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबांचे जीवन झाले होते. अशावेळी त्यांची बायको-संती मुलाला मकरेंद्राला ठेवून पाणी आणण्याकरिता जाते आणि त्यावेळी ती म्हणते, धनी, बाळावर जरा लक्ष ठेवा. पण त्यावेळी गोरोबांचे देहभान हरपून गेले होते. गोरोबा चिखल तुडवित आहेत आणि बाळ, रांगतरांगत पित्याकडे धावत आहे. अन् ते खेळत खेळत बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. हसतहसत पित्याच्या पायाला धरता धरता ते चिखलात पडते. गोरोबा-काका डोळे मिटून भाव समाधीत होते. देहवृत्ती शून्य दशेतच विठ्ठल नामस्मरणात रत होते. मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एकुलता एक मुलगा पायाखाली आला. ते चिखलासवे मुलालाही तुडवू लागले. त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला. अशाप्रकारे मुलाचे रक्तमांस, हाडे चिखलात मिसळली. मुलाचा प्राण ताबडतोब गेला. मुलाच्या रक्तमांसाने चिखल रंगला. संती पाणी घेऊन घरी आली. पण तिला दारात मूल दिसले नाही. तिने गोरोबांना विचारले, परंतु गोरोबांचे लक्ष संतीच्या विचारण्याकडे नव्हते. शेवटी ती मनात दचकली आणि तिची नजर चिखलाकडे गेली. आपला बाळ चिखलात तुडविला गेला आहे, हे तिच्या लक्षात आले. संतीने आक्रोश सुरु केला. बायकोचा आक्रोश कानावर येताच गोरोबा ध्यानावर आले आणि संती रागारागाने गोरोबाला बोलू लागली,
जळो हे भजन तुझे, जळो तुझा पांडुरंग आता. संतीच्या आकांताने मूल आपल्या पायाखाली तुडविले गेले आहे हे गोरोबांच्या लक्षात येते. गोरोबांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते. त्यांच्या अंत:करणाला खूप वेदना होतात. परंतु संतीने विठ्ठलाविषयी जे अनुद्गार काढले. त्यांनी गोरोबा खवळले. त्यांनी तिला हातातील चिपळ्या फेकून मारल्या आणि चाकाचे दांडके काढून मारायला धावले. त्यावेळी संतीने गोरोबांना विठ्ठलाची शपथ घातली, खबरदार हातबोट मज लावशील तर. आता संतीने विठ्ठलाची शपथ घातल्याने गोरोबा मारता मारता तिथेच थांबले. संतीचा आकांत सुरुच होता. सगळा प्रकार आता गोरोबाला चांगलाच उमजला अन् गोरोबा संतीला म्हणाले, कारभारणी, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. संतीने देखील याप्रसंगी अखेर मनावर ताबा ठेवला.
काही दिवस गोरोबा-संतीचा अबोला चालला, कोणीही कोणाशीच बोलेना चालेना.एके दिवशी संतीने असा विचार केला की, असा अबोला धरून आपला संसार कसा चालणार? संतीला मुलाची आणि मातृत्वाची ओढ होती. “आण ना बाण उगीचच संसारात ताण’ निर्माण झाला. उगाउगी आपण धन्याला विठ्ठलाची आण घातली. त्यामुळेच त्यांनी प्रपंचा विषयी विरक्ती स्विकारली, संसारापासून दूर जाऊ लागले असे तिला वाटू लागले. एक वंशाचा दिवा गेला आता वंशाला दुसरा दिवा हवा. संतीने मनाशी विचार केला अन् ती एके दिवशी गोरोबांचे पाय धुण्याकरिता गेली असता गोरोबा म्हणतात, खबरदार, माझ्या अंगाला स्पर्श करशील तर! अग तू मला विठ्ठलाची शपथ घातली आहेस ना? मग माझ्या अंगाला हात का लावतीस! अग सूर्य पश्चिमेस उगवेल! समुद्र आपली मर्यादा सोडील परंतु विठ्ठलाची शपथ मी कधी मोडणार नाही. संसार पुढे वाढवण्यासाठी संतीने आपली धाकटी बहीण रामी आणि गोरोबा यांचा विवाह संपन्न केला. संती आणि रमी मध्ये भेद करू नका, असं वचन लग्नात सासऱ्यांनी गोरोबा कडून घेतले. म्हणून गोरोबांनी संतीप्रमाणे रामीलाही स्पर्श केला नाही. संसार हितासाठी संतीने एक युक्ती योजिली. ती आपल्या बहिणीला म्हणाली, हे बघ रामी, आता आपण त्यांना विठोबाची शपथ मोडण्यास भाग पाडू. मी सांगेन तसंच वागायचं! संतीने काय करायचे ते रामीला समजावून सांगितले. एका रात्री दोघींनी मिळून त्याप्रमाणे विचार केला. आणि गोरोबा दिवसभर नामस्मरण व भजन करून शांतपणे झोली गेले असता संती आणि रामी गोरोबाच्या दोन्ही बाजूस झोपल्या.
दोघांनी ठरल्याप्रमाणे गोरोबाचे हात उचलून आपापल्या अंगावर ठेवले. अन् दोघीही शांतपणे झोपी गेल्या. गोरोबांना पहाटे जाग आली तेव्हा लक्षात आले की
आपले दोन्ही हात कुणीतरी घट्ट धरून ठेवले आहेत. अन् गोरोबा झटकन् उठले. त्यांना संती व रामी यांचा अत्यंत राग आला. गोरोबांचा संताप पाहून संतीने त्यांना दोघींनी केलेला सारा प्रकार सांगितला. तेव्हा गोरोबा म्हणाले, यात तुमचा काही दोष नाही तो माझ्या हातांचाच दोष आहे. अरेरे! घात झाला. मी माझ्या हातांनी विठ्ठलाची शपथ मोडली. गोरोबांना झाल्या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला, दुःख झाले. ते संतीला रामीला म्हणाले, हे काय केले तुम्ही. मी तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न केले. तुला अन् रामीला मी उगीच त्रास दिला. असे हे माझ्या हातून दुहेरी पाप घडले. माझे हातच अपराधी आहेत. या अपराधी हातांना शासन झाले पाहिजे. पण आता मी काय करु! मी विठ्ठलाची आण मोडली! झाल्या चुकीबद्दल संती-रामी यांनी गोरोबांची खूप क्षमा मागितली, अन् त्या दुःखाने व्यथित होऊन गोरोबापासून दूर निघून गेल्या अन् घरकामाला लागल्या. इकडे गोरोबांनी धारदार शस्त्रावर दोन्ही हात आपटून घेतले. गोरोबांचे दोन्ही हात तुटले. त्यांना शारीरिक वेदना खूप झाल्या. पण प्रायश्चित घेतल्याचे समाधान त्यांना वाटत होते. गोरोबांनी हात तोडले तिथे रक्ताचा थेंबही दिसला नाही. अन् शारीरावर जखमही कोठे दिसेना. गोरोबा संतीला व रामीला म्हणाले, तुम्हा दोघींना दोन हात दिलेत ते घ्या आणि तेरणा नदीच्या पलीकडे टाका. त्याप्रमाणे त्या दोघी गोरोबांच्या आज्ञेप्रमाणे हात तेरणा नदीपलिकडे टाकतात. अन् पाहतात तर नवल दोन्ही हात गुप्त झाले. या घटनेमुळे आपला पती परमेश्वर भक्त आहे याची संतीला खात्री झाली. गोरोबांचे श्रैष्ठत्व तिच्या लक्षात आले आणि तिच्या मनाचे परिवर्तन झाले. गोरोबांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाचा त्याग केला, संतीने आणि रामीने गोरोबांचे मोठेपण मान्य केले अऩ् त्या दोघी संसार करू लागल्या, पण गोरोबांनी वैराग्यवृत्ती धारण केल्याने घरात धन-धान्य याची कमतरता भासू लागली. पण शेवटी भक्ताच्या संसाराची काळजी परमेश्वरालाच असते. भक्त गोरोबा याच्या संसाराची दयनीय अवस्था पाहून विठ्ठलाला काळजी वाटते. ते गोरोबांच्या घरी जावयाचे ठरवतात. विठ्ठलाबरोबर रुक्मिणी आणि गरुडही जावयास तयार होतात. ते तिघेही वेष पालटून निघाले. विठ्ठल स्वतः विठू कुंभार झाले. रुक्मा कुंभारीण झाली. गरुड गाढव झाले. अशाप्रकारे तिघे वेष पालटून तेर गावात आले. आम्ही कुंभार आहोत आणि आम्हांला काम मिळावे म्हणून ते गावात फिरू लागले. ते गोरोबाच्या घरी जातात अन् म्हणतात, आम्ही मन लावून काम करु. आम्हाला मडकी घडावयास व भाजावयास येतात. आमचे काम बघून मग आम्हाला ठेवून घ्या. आम्हांला पैश्याची अपेक्षा नाही. आपण जे सांगाल ते काम करु आणि मिळेल ते पोटाला खाऊ. गोरोबांनी त्यांना आनंदाने कामाला ठेऊन घेतले. तिघेही आनंदाने गोरोबांच्या घरी राहिले. अन् भक्ताच्या घरी देव माती वाहू लागले. नानाप्रकारची मडकी घडू लागले. प्रेमाने भक्ताच्या घरी काम करु लागले. गरुड माती वाही. विठ्ठल चिखल तुडवी. रुक्मिणी पाणी भरी. अन् विठ्ठल चाकावर नाना प्रकारची गाडगी-मडकी तयार करु लागले. भगवंत विठ्ठल आपल्या भक्ताच्या नानाप्रकारची कलाकुसरीची मडकी तयार करु लागला आणि ती गाडगी मडकी जाळ्यामध्ये बांधून विठ्ठल आणि रुक्मिणी आसपासच्या गावी बाजारात गाडगी मडकी विकू लागले. संध्याकाळी रुक्मिणी स्वयंपाक करी. गोरोबा आणि विठ्ठल एका पात्रात जेवत असत. रुक्मिणीने केलेल्या स्वयंपाकाचा सर्वजण आस्वाद घेऊ लागले. एके दिवशी नेहमीप्रमाणे गोरोबा व विठ्ठल एका पात्रात जेवू लागले. विठ्ठल गोरोबाच्या मुखी घास घालून भक्ताला भरवू लागले तर गोरोबांनी ही विठ्ठलाला घास भरवण्याकरिता हात पुढे केला. या भक्ती प्रसंगी गुरोबांना कळले देखील नाही की विठ्ठलाने त्यांचे हात मूळ रूपात त्यांना कधी परत केले. अशाप्रकारे परमभक्त गोरोबांच्या घरी सेवेसाठी विठ्ठल-रुक्मिणी तेर नगरीत तब्बल सात महिने सव्वीस दिवस राहिले.
चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९- २० एप्रिल १३१७ रोजी गोरोबा पांडुरंग चरणी विलीन झाले. जनसामान्यांना त्यांचे जीवन, आदर्श भक्त कसा असावा? यासाठी प्रेरणादायी व चैतन्यदायी असे वाटतो.
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा,
उडे अंतराळी आत्मा सोडुनि पसारा.
नाम तुझे घेतो देवा,
म्हणून आठयावं.
देह प्रपंचाचा दास,
सुखे करो काम, सुखे करो काम.
तुझे रूप चित्ती राहो,
मुखी तुझे नाम...🙏
Comments
Post a Comment