कुदनूर येथील सॉ मिल् , ऑईल मिल, फॅब्रिकेटर्स कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान.
कुदनूर येथील सॉ मिल् , ऑईल मिल, फॅब्रिकेटर्स कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान.
---------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
नूतन वर्ष २०२३ च्या आरंभीच (कुदनूर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील शशिकांत सुतार व बंधू यांच्या लाकूड कापण्याचे अरायंत्र (सिद्धेश्वर सॉ मिल), तेल गिरणी (सिद्धेश्वर ऑइल मिल) व शिवराम फॅब्रिकेटर्स या कारखान्यांना भीषण आग लागली. या आगीत सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले. या आगीत कारखान्यात बांधलेल्या दोन बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ही घटना आज (१ जानेवारी) सकाळी ४ वाजता घडली. शशिकांत सुतार, त्यांचे बंधू व कुटुंबीय गेली अनेक वर्षे कुदनुर कालकुंद्री मार्गानजीक अरायंत्र चालवतात. गेल्या काही वर्षात त्यांनी याच कारखान्यालगत तेल गिरणी व फॅब्रिकेटर्सचा मोठा व्यवसाय सुरू केला होता. या कारखान्याला अचानक पहाटे भीषण आग लागली. त्यात तिन्ही कारखान्यांचे मिळून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याने सुतार कुटुंबियांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. लाकूड व तेल साठ्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. गडहिंग्लज नगर परिषदेचा अग्निशमक बंब येईपर्यंत तिन्ही कारखाने आगीच्या भक्षस्थानी पडले होते. लाकूड व तेल गिरणीच्या साठ्यामुळे आग इतकी भीषण होती की, अग्निशामक दलाचा पाण्याचा पूर्ण बंब संपला. यावेळी ग्रामस्थांनीही जीवाची बाजी लावत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आत गॅस सिलेंडर असल्याचे समजल्यामुळे यावरही भीतीमुळे मर्यादा आल्या.
तिन्ही कारखान्यांची मशिनरी, विद्युत मीटरसह मोठा लाकूड साठा, तेल काढण्यासाठी आणलेल्या शेंगा व काढलेले तेल फॅब्रिकेटर्स व्यवसायासाठी आणलेले लोखंड, ट्रॅक्टर ट्रॉली व शेड इमारत आगीच्या भक्षस्थानी पडले. गेल्या काही वर्षात सुतार बंधूनी येथे शिवराम ट्रॅक्टर ट्रॉली बनवण्याचा उद्योग सुरू केला होता. त्याचेही मोठे नुकसान झाले. येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आगीची सुरुवात पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांनी दाखवत असून, त्यानंतर हा कॅमेराही आगीत सापडला. यावेळी तेथे दोन व्यक्तींचा वावर असल्याचे दिसते असे सुतार बंधू यांनी सांगितले. घटनेच्या रीतसर पंचनामा सकाळी दहा पर्यंत झालेला नव्हता. एकंदरीत नववर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment