‘ऑगस्ट क्रांती’तून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे: - डॉ. सुनिता गीते.
------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
------------------------------
वाई: दि. १४, विद्यार्थ्यांनी ‘ऑगस्ट क्रांती’ या ऐतिहासिक घटनेतून प्रेरणा घेऊन इतिहासासारखा पारंपारिक विषय विविध दृष्टीकोनातून अभ्यासून आपले करिअर घडवावे असे प्रतिपादन डॉ. सुनिता गीते यांनी केले. ‘ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त किसन वीर महाविद्यालयातील इतिहास विभाग, राज्यशास्त्र विभाग, आयक्यूएसी व शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद (रजि.), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या विशेष निमंत्रित वक्त्या म्हणून बोलत होत्या.
डॉ. गीते, (इतिहास विभाग प्रमुख, मीनलबेन मेहता महाविद्यालय, पांचगणी) यांनी ‘ऑगस्ट क्रांती दिन: एक समग्र आकलन’ या विषयावर बोलताना आधुनिक भारताच्या इतिहासातील ‘ऑगस्ट क्रांती दिना’चे ऐतिहासिक व समकालीन महत्त्व विशद करून ती एक ‘लोकचळवळ’ होती, तत्कालीन भारतीय समाज, धर्म, संस्कृतीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतीय जनमानसात केलेल्या सुधारणा, कायद्याचे राज्य हे प्रशासनाच्या सोयीसाठी केलेली धोरणात्मक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदल होता. त्याचीच परिणती राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेत झाली. त्यात कालांतराने मवाळ, जहाल, क्रांतिकारी असे गट तयार झाले. लो. टिळकांच्या मृत्यूनंतर ‘गांधीयुग’ हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्त्वाचे पर्व होते. या युगात 'असहकार चळवळ', ‘सविनय कायदेभंग चळवळ, व १९४२ ची ‘चले जाव’ (‘छोडो भारत’) या महत्त्वाच्या ब्रिटीश साम्राज्यविरोधी लढे होते. त्या पुढे म्हणाल्या की, १९४२ चे आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. ९ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना ब्रिटिशांनी अटक करून भारतातील विविध ठिकाणी स्थानबद्ध केले.त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थी, शिक्षक, वकील, शेतकरी, कामगार, कारागीर इ. समाजातील विविध स्तरातील घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवून ब्रिटीश साम्राज्यावादाला प्रचंड मोठे हादरे दिले. म. गांधीना अटक झाल्यानंतर जनतेने केलेला संघर्ष भारताच्या स्वातंत्र्य चळवळीस लोक चळवळ म्हणून पुढे आला. या चळवळीस पुढे जागतिक मान्यता मिळाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना असे प्रतिपादन केले की, ‘क्रांती’ हे शब्द ऐकल्यानंतर मनामध्ये एक उत्साह संचारतो.‘हरितक्रांती’, ‘धवलक्रांती’अशा अनेक क्रांत्या झाल्या. या मागे आपण ठरविलेले ध्येय जलद गतीने प्राप्त करणे हा हेतू असल्याचे पाहायला मिळते. त्याप्रमाणे‘ऑगस्ट क्रांती’ ही भारताला शीघ्र गतीने स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी अंगीकारलेली चळवळ होती. भारताचा इतिहास हा अखंड मानवी विकासाचा चढता आलेख दर्शवितो, आणि ते सर्वाना, विशेषत: इतिहासाचे अभ्यासक, संशोधक विद्यार्थी यांना प्रेरणादायी आहे, असेही ते पुढे म्हणाले.
या वेळी व्यासपीठावर वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य श्री. बी. बी.पटकुरे, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.) सी. एस. कांबळे, इतिहास विभागप्रमुख डॉ. भिमाशंकर बिराजदार, श्री. राजेंद्र जायकर उपस्थित होते.
डॉ. भिमाशंकर बिराजदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकेत त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ऐतिहासिक घटनांची समग्र मांडणी करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. श्री. राजेंद्र जायकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री. विनायक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर श्री. सुमंत सावंत यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments