Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही.

-------------------------------

कोल्हापूर, प्रतिनिधी

-------------------------------

*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण संपन्न*

*सर्वसामान्यांसाठीच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील*

: शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यटन, ग्रामविकास आदी विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देत  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन करुन सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर  महाराणी ताराबाई सभागृह येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजक राजश्री मनोहर पाटील (प्रथम), रमेश शंकरलाल पारिक (व्दितीय) यांना जिल्हा पुरस्कार २०२३ देवून गौरविण्यात आले. यावेळी पोलीस पाटील उदय भरमा पुजारी (भडगाव, ता.गडहिंग्लज) यांना विशेष उल्लेखनिय सेवा पुरस्कार देण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी सारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये 'कांस्य' पदक मिळवून ‘जगात भारी कोल्हापुरी’ ही म्हण पॅरीसमध्ये सार्थ ठरवली आहे. नेमबाजीत चमकदार कामगिरी करत जिल्ह्यासह देशाचं नाव उंचावणाऱ्या नेमबाज स्वप्निल कुसाळे याच्या यशामुळे खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात तब्बल ७२ वर्षांनंतर पदक मिळवून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. या  यशाबद्दल स्वप्निल आणि त्याच्या आई वडीलांचे अभिनंदन... खेळाला आणि खेळाडूंना चालना देण्यासाठी क्रीडा क्षेत्रात अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यानिमित्तानं व्यक्त केला.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच कटिबध्द होणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आणि सन्मान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर या दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी व नवीन आवश्यक इमारतींचे बांधकाम करण्यासाठी एकाच वर्षात जवळपास १२०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये राज्य योजनेअंतर्गत संस्थेचे अद्यावतीकरण व यंत्रसामग्री करता २६७ कोटी, राज्य योजनेअंतर्गत बांधकामा करिता एकूण ७९९ कोटी, जिल्हा नियोजन समिती मधून २२.८६ कोटी रुपये निधी, कागल येथील १०० खाटांचे रुग्णालय, उत्तुर आजरा येथील ५० खाटांचे रुग्णालय, सांगाव कागल येथे १०० खाटांचे आरोग्य पथक यासह यंत्रसामुग्रीसाठी २३७.१४ कोटी देण्यात आले आहेत. कागलमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि त्याला संलग्न १०० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय आणि उत्तूर मध्ये योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वय वर्ष ६५ पुर्ण असणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत जुलै अखेर ५ हजार ६८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. ही योजना महत्वकांक्षी असून गरजुंसाठी शासनाने सुरु केलेली अत्यंत चांगली योजना आहे.

महिलांच्या अर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करुन कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना १५०० रुपये प्रति महिना म्हणजेच १८ हजार रुपये प्रति वर्ष मिळणार आहेत. जिल्ह्यात ६ लाख ९२ हजार महिला नोंदणीनंतर पात्र झाल्या आहेत. अजूनही नोंदणी सुरु असून आत्तापर्यंत पात्र झालेल्या महिलांना दोन महिन्यांचे १५०० रुपयांप्रमाणे २०७.६० कोटींचे वितरण सुरु होईल.

कामगार विभागाच्या अधिपत्याखालील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील सुमारे १ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली असून या बांधकाम कामगारांना सुरक्षासंच व अत्यावश्यक संच, गृहोपयोगी वस्तु संच वाटप करण्यात येत आहेत. नोंदीत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेमधून २०२३- २४ याकालावधीमध्ये सुमारे १०३ कोटी ९२ लाख आर्थिक लाभाची रक्कम कामगारांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा केली आहे.
जिल्ह्यात मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत १५ विविध प्रकारचे प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाले असून त्यांना सुमारे २ कोटी ५० लाख रुपये अनुदान स्वरुपात वितरीत झालेले आहेत. यामध्ये काजू, नाचणी, भात व गूळ या प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेमुळे छोट्या उद्योगांना हातभार लागला आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सन २०२३-२४ अंतर्गत हरीतगृह, शेडनेट, सामुहिक शेततळे, फलोत्पादन, यांत्रिकीकरण, मनुष्यबळ विकास कार्यशाळा प्राथमिक फळप्रक्रिया केंद्र या घटकांकरीता ११५ लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. फक्त १ रुपया भरुन विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी व खरीप ज्वारी ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. खरीप हंगामात ८६ हजार ६३८ शेतक-यांनी सहभाग घेतला असून २३ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केली आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत १२१ लाभार्थ्यांना जिल्हास्तरावरुन २४० लाख रुपये निधीचे वितरण अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांच्या खात्यावर जमा केले आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ४ लाख ७० हजार लाभार्थ्यांना लाभ दिला जात असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत मार्च २०२४ अखेर ४ लाख ७० हजार लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आला आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५६३ वस्त्यांमधील कामांसाठी ३८ कोटी ९ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन देण्याच्या योजनेअंतर्गत सन २०१९-२० ते २०२३- २४ अखेर एकूण ५०० कलावंतांची निवड करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानातून दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या महत्वाच्या धोरणांतंर्गत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत एकूण ३५ हजार ५१३ घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी २७ हजार ९५१ (७९ %)घरकुले पूर्ण झाली आहेत तसेच 7 ७ हजार ५६२ घरकुले प्रगतीपथावर आहेत.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या 'महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम' (एमआरडीपी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे.  ३ हजार २०० कोटींच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक २ हजार ३३८ कोटी रुपयांचे वित्तसहाय्य करणार आहे. राज्य शासन ८६२ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दिनांक १२ ऑगस्ट २०२४ अखेर जिल्ह्यामध्ये शासकीय व खासगी अशा एकूण १४० आस्थापनांनी नोंदणी केली असून ४ हजार ६१० पदे ऑनलाईन अधिसूचित केली आहेत, त्यापैकी २२९ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. तर ५४ उमेदवार आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत.

एकत्रित महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत गोल्डन कार्ड (PM-JAY) आरोग्य विमा योजना आहे. या योजने अंतर्गत ५ लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत. या योजनेंतंर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १२ लाख ३८ हजार लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या वतीने गौरी गणपती सणादरम्यान आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यात १०० रु. मध्ये पामतेल, रवा, चणाडाळ, साखर इ. जिन्नस असतील. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य लाभार्थी योजना या शिधापत्रिकाधारकांना जानेवारी २०२३ पासून मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत ५ लाख ८६ हजार १२५ इतक्या कार्डावर २४ लाख ७९ हजार ९३४ इतक्या सदस्यांना दरमहा ७ हजार मे. टन तांदूळ व ५ हजार मे. टन गहू वितरीत केला जात आहे.

कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासाला अधिक समृध्द करण्यासाठी कटीबध्द आहे. या देशाची एकता, स्वातंत्र्य आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिवीरांच्या बलिदानातून प्राप्त झालेले हे भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, असे  सांगून त्यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या व अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमानंतर सर्व नागरिकांनी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांना भेटून शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments