सत्ता नसताना काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी ओघ वाढला : सतेज पाटील.
------------------------------------
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------------
गांधीनगरमधील सरपंचांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.
गांधीनगर : केंद्रात, राज्यात कुठेही सत्ता नसताना काँग्रेस पक्षात व बंटी पाटील गटात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ वाढत आहे, याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी येथे केले.#
गांधीनगर युवाशक्तीचे अध्यक्ष सचिन जोशी, लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हेगडे व सामाजिक कार्यकर्ते राजू चंदनशिवे यांच्या काँग्रेस प्रवेशप्रसंगी सिंधी सेंट्रल पंचायत सभागृहात झालेल्या समारंभात सतेज पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील होते. हा प्रवेश महाडीक गटाला धक्का मानला जातो.# सतेज पाटील म्हणाले की विरोधकांकडे असलेला सचिन जोशीसारखा निष्ठावंत कार्यकर्ता, लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे आणि त्यांचे सहकारी ऋतुराज पाटील यांना भेटले. गांधीनगर महसुली गाव नसल्याने व डी एस सी ऍक्टिव्ह नसल्याने सुमारे सव्वा कोटीचा निधी लाल फितीत अडकून पडला असल्याचे त्यांनी ऋतुराज पाटलांच्या निदर्शनास आणून दिले. ऋतुराज पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून डीएससी ऍक्टिव्ह केली. तो निधी उपलब्ध करून दिला. हे करताना ही सर्व मंडळी विरोधक आहेत, असे आम्ही कधी म्हटले नाही. गांधीनगर सह परिसरातील गावांसाठी नवीन पाणी योजना ऋतुराज पाटील यांनी मंजूर करून आणली आहे. त्यामुळे यापुढे पाण्याचा प्रश्नही उभा राहणार नाही.#
लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे म्हणाले की विरोधकाऐवजी आमच्या स्वकीय आघाडीतील काहींनी आम्हाला त्रास दिला. याबाबत नेतेमंडळीकडे गेलो, तेथेही न्याय मिळाला नाही. दीड वर्षात महसुली गाव नसल्याने एकही विकासकाम करता आले नाही. कामगारांचे वेतन थकीत आहे. याबाबत सर्वांकडे याचना केली. पण कुणीही लक्ष घातले नाही. आघाडीच्या नेत्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वत्र निराशा झाली. अखेर आम्हाला नाईलाजाने अजिंक्यताराची पायरी चढावी लागली. #
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की मी प्रामाणिक लोकप्रतिनिधी आहे. कोणावरही टीका करण्यापेक्षा मी सर्वसामान्यांच्या समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहे. कोणीही आला तरी त्याच्या प्रश्नाचे निराकरण करण्याचे काम मी करत आलो आहे. यापुढेही करत राहीन.
आशिष पाटील, संजय पाटील, प्रल्हाद शिरोटे, निवास तामगावे, गजेंद्र हेगडे, कपिल घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. उचगावचे सरपंच पैलवान मधुकर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गोवालदास कटार, होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक तेहल्यानी, उपाध्यक्ष सेवाराम तलरेजा, उपसरपंच विनोद हजुराणी, माजी उपसरपंच गुड्डू सचदेव, रिटेलचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा, विलास मोहिते यांच्यासह गांधीनगर पंचक्रोशीतील ग्रामपंचायत पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
...फोटो ओळी....#
गांधीनगर : युवाशक्तीचे अध्यक्ष सचिन जोशी, सरपंच संदीप पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हेगडे व राजू चंदनशिवे यांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील व मान्यवर.#
0 Comments