नागाव विकास सोसायटीची वार्षिक सभेत वादळी चर्चा!
नागाव विकास सोसायटीची वार्षिक सभेत वादळी चर्चा!
------------------------------
कुंभोज/प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
नागांव विविध कार्यकारी (विकास) सेवा संस्था मर्या. नागांव, ता.हातकणंगले ची वार्षिक सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. खुद्द चेअरमन महावीर पाटील यांनी अहवालातील विषयांवर आक्षेप घेतला. यामुळे उपस्थित सभासद बुचकळ्यात पडले.
संस्थेच्या कै. ज. बा. उर्फ अण्णासाहेब पाटील सभागृहात हि सभा आयोजित करण्यात आली होती.
सभा सुरू होताच चेअरमन महावीर पाटील यांनी स्वतः संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराचा व भोंगळ कारभाराचा सभासदांच्या पुढे पाढाच वाचला. तसेच अहवालातील विषय आपणाला विश्वासात न घेता कांही संचालकांनी मांडले आहेत. विकास सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच
असे घडले आहे. तसेच आपणास विश्वासात न घेता विषय मांडून अहवाल तयार केला गेला. त्यामुळे चुकीच्या व नियमबाह्य विषयांना आपला तीव्र विरोध असल्याचे संस्था चेअरमन व वारणा दूध संघाचे माजी संचालक महावीर पाटील यांनी सभासदांना सांगिलते. तसेच याबाबत आपण उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल करुन चौकशीची मागणी करणार असल्याचे महावीर पाटील यांनी सांगितले.
तसेच प्रगतशील शेतकरी राज काकासो पाटील यांनी सोसायटीच्या कारभाऱ्यांनी यापूर्वी एक संस्था बुडविली आहे. तर दुसरी संस्था स्वतः च्या घशात घातली आहे.त्यामुळे संचालक मंडळाकडून झालेला व भविष्यातील होणारा अनाठायी खर्च यामुळे संस्था मोठ्या अडचणीत येणार आहे असा आरोप केला. तसेच संचालकांत असणारे टोकाचे मतभेद, संस्थेत संचालका व्यतिरिक्त इतर लोकांचा होणारा हस्तक्षेप, संस्थेचा राजकीय स्वार्थासाठी होत असलेला वापर असे म्हणत त्यांनी आपल्या सभासद पदाचा राजीनामा दिला आहे.व आपली संपूर्ण देय रक्कम कर्मचाऱ्यांना वाटप करावी असे लेखी स्वरूपात दिले आहे.
विरोधी गटाचे माजी सरपंच अरुण माळी, प्रकाश पोवार, गणपती माळी, किरण मिठारी, जीवंधर पाटील,अशोक सोळांकुरे,उमेश भोसले यांनी खत खरेदी मध्ये असणारी तफावत व कमिशन यासह अनेक गोष्टी सभासदांच्या निदर्शनास आणून दिल्या.एकूणच संस्थेची वार्षिक सभा पाहता नागावच्या तमाम शेतकरी, कष्टकऱ्यांची असणारी ही संस्था डबघाईला जाण्यास वेळ लागणार नाही.अशी चर्चा सभासद व ग्रामस्थांच्यातून व्यक्त होत आहे.
या सभेस संस्थेचे संचालक मंडळ,सभासद, सचिव , कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment