पन्हाळा किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी.

 पन्हाळा किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी.

*कोल्हापूर, दि. ५ (प्रतिनिधी)*:- प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून  युनेस्कोच्या शिष्टमंडळाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याला भेट दिली आणि पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी केली. या पथकाने धर्मकोठी, सज्जाकोठी, अंबरखाना, तीन दरवाजा या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिल्या. या पथकाने किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली. या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञ हेवान्ग ली, अतिरीक्त महानिर्देशक जागतिक वारसा (एएसआय) जानवीश शर्मा, महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक डॉ.विलास वाहणे, डॉ.शुभा मजुमदार यांचा समावेश होता.


जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली. तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय, सुरु असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. यावेळी स्थानिक नागरिकांनी पन्हाळा संवर्धनासाठी स्वच्छता व प्रशासनाने दिलेल्या सूचनांबाबत सहाय्य केले असून यापुढेही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


युनेस्कोने नामांकनाच्या यादीमध्ये पन्हाळा किल्ल्याचे नाव समाविष्ट केल्याबद्दल श्री. येडगे यांनी आभार व्यक्त केले. तसेच गडाच्या जतनामध्ये एकूणच प्रशासन, स्थानिक नागरिकांचा असलेला सहभाग याविषयी माहिती दिली. यावेळी पथकातील मान्यवरांनी पन्हाळा किल्ल्याविषयक केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. 


भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पन्हाळा- शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली मडकर, मुख्याधिकारी चेतन माळी आदींनी चर्चेत सहभाग घेतला. पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी, स्थानिक नागरिकांशीही या पथकाने संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या 12 निवडक किल्ल्यांपैकी महत्त्वाचा असलेला या पन्हाळा किल्ल्याला जागतिक वारसा मिळेल असी अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.