ध्येयासाठी परीश्रम घ्या - मा. योगिंदर सिंग.
ध्येयासाठी परीश्रम घ्या - मा. योगिंदर सिंग.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
वाई, ता. १२ : एन.सी.सी. छात्रांनी अपार कष्ट करण्याची तयारी ठेवावी. वर्दी मिळवण्यासाठी कष्टाला दुसरा कोणताही पर्याय नाही, त्यामुळे प्रथम ध्येय निश्चित करुन परीश्रम घ्यावेत व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे एन. सी. सी. प्रमुख मेजर जनरल योगिंदर सिंग (विशेष सेवा मेडल) यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील एनसीसी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले होते. याप्रसंगी कोल्हापूर ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अभिजीत वाळिंबे, एन.सी.सी. २२ महाराष्ट्र बटालियन साताराचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजमनीयार (सेना मेडल), मुंबईचे स्टाफ डायरेक्टर कॅप्टन जनेश जॉर्ज, सुभेदार मेजर तानाजी भिसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, प्रा. रमेश डुबल, कॅप्टन डॉ. समीर पवार, कार्यालय प्रमुख बाळासाहेब टेमकर, डॉ. संग्राम थोरात, श्री. राजेंद्र जायकर, जितेंद्र चव्हाण, द्रविड हायस्कूल वाईचे चीफ ऑफिसर महेश इनामदार, महर्षी शिंदे विद्यालय वाईचे फर्स्ट ऑफिसर पांडुरंग शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. योगिंदर सिंग म्हणाले, आपला भारत देश तरुणांचा देश आहे. सर्वांचे लक्ष आजच्या तरुणांकडे आहे. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी आपले योगदान हवे. तुम्ही नशीबवान आहात कारण तुम्हाला या वयामध्ये वर्दी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वश्रेष्ठ होऊ शकता. वर्दीच्या माध्यमातून देश सेवा साधता येते. आर्मी, नेव्ही व हवाई दल या कोणत्याही दलामध्ये तुम्ही गेलात तरी देशसेवा साधता येईल. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच कठोर परिश्रम घ्या. श्वेता धनावडे, वैभवी भणगे या छात्रांशी त्यांनी आपल्या भाषणातून त्यांनी संवाद साधला व किसन वीरच्या एन.सी.सी. युनीट चे कौतुक केले.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सीनियर अंडर ऑफिसर सानिका जाधव हिने सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय करून दिला, कॅप्टन डॉ. समीर पवार यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. मनोज शिंदे, श्री. गजानन जाधव, श्री. राहुल तायडे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास किसन वीर महाविद्यालयातील एनसीसी युनिटचे छात्र, द्रविड हायस्कूलमधील एनसीसी युनिटचे छात्र व महर्षी शिंदे हायस्कूलचे एनसीसी युनिटचे छात्र, प्राध्यापक, कर्मचारी व सेवक यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment