'किसन वीर' चे शनिवार पासून धावडी येथे श्रमसंस्कार शिबिर.
'किसन वीर' चे शनिवार पासून धावडी येथे श्रमसंस्कार शिबिर.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
वाई, दि. १६ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर धावडी येथे शनिवार दि. १८ ते शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. शनिवार दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता वेळे येथील यशोधन अनाथाश्रमाचे अध्यक्ष रवी बोडके यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. धावडीच्या सरपंच सौ. वनिता महेंद्र ननावरे, उपसरपंच अनिल रामराव मांढरे, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि धावडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात ॲड. उमेश सणस, प्रा. रमेश डुबल, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे, ॲड. राजवर्धिनी भोसले या मान्यवरांची विविध विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने होणार आहेत. वाई पोलिस ठाण्याचे पोलिस उपअधीक्षक शाम पानेगावकर, जनता शिक्षण संस्थेचे संचालक केशवराव पाडळे यांच्या उपस्थितीत दि. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता समारोप होणार आहे. या शिबिरात ग्रामस्वच्छता, शोष व पाझर खड्डे, जल व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, वनराई बंधारा बांधणे अशी विविध कामे केली जाणार असल्याचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट यांनी सांगितले.
या शिबिरातील कार्यक्रमांचा लाभ धावडी ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment