आज वाईतील ३५० वर्षांची परंपरा असलेला कृष्णाबाईचा उत्सव सुरू झाला.
आज वाईतील ३५० वर्षांची परंपरा असलेला कृष्णाबाईचा उत्सव सुरू झाला.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
वाईतील ७ घाटांवर माघ शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन शुद्ध द्वादशी पर्यंत चालणाऱ्या या उत्सवाचा इतिहास असा की, जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीवेळी वाईतील शेंडे शास्त्री व इतर ब्रह्मवृदांनी आई कृष्णेच्या पत्रात उभं राहून नवस केला की जर आमचा राजा सुखरूप परत आला तर आम्ही तुझा उत्सव सुरू करू' आणि महाराज प्रतापगडावरून सुखरूप परत आल्यावर वाईतील रामडोह आळीच्या घाटावर पहिला उत्सव सुरू झाला. आता तो वाईतील सातही घाटांवर अविरत सुरू आहे. सर्व घाटांवरील उत्सवाचे स्वरूप साधारणतः एकसारखे असते. उत्सवाची सुरुवात छाबिना म्हणजेच पालखीने होते. पालखीवेळी पारंपरिक सातारी धनगरी ढोल वाजवले जातात. यानंतर उत्सव काळात विविध प्रकारचे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम असतात. एक दिवस प्रयोजन म्हणजेच महाप्रसाद असतो आणि यामध्ये आमटीभात, वांग्या बटाट्याची भाजी, मिरचीचा खर्डा आणि एखादा गोड पदार्थ असतो. प्रत्येक घाटावर सरासरी चार हजार भक्त प्रसादाचा आस्वाद घेतात. उत्सवाची सांगता लळीताच्या कीर्तनाने होते. हा उत्सव खरंच वाईकरांसाठी आनंदाची पर्वणीच असते.
Comments
Post a Comment