आमदार राहुल आवाडे यांचे पूरवठा अधिकारी यांच्यावर ताशिरे.
आमदार राहुल आवाडे यांचे पूरवठा अधिकारी यांच्यावर ताशिरे.
------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
आठवडाभरापूर्वी सूचना देऊनही येथील पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांच्या कामकाज पध्दतीत कोणताही बदल झाला नसल्याचा प्रत्यय दस्तुरखुद्द आमदार राहुल आवाडे यांना दुसर्यांदा आला. या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत आमदार आवाडे यांनी प्रभारी नायब तहसिलदार सुरेखा पोळ यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आणि उशीरा येणार्या अधिकारी व कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने यांना दिले. यामुळे पुरवठा कार्यालयातील अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
येथील पुरवठा कार्यालयातील कामकाज पध्दतीबद्दल आणि अधिकारी, कर्मचार्यांच्या अरेरावी प्रकरणी प्राप्त तक्रारींची दखल घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी 31 डिसेंबर रोजी पुरवठा कार्यालयात आढावा बैठक बोलविली होती. त्यावेळी आमदार आवाडे कार्यालयात पोहचले तरी कार्यालय बंदच होते. तर बरेच अधिकारी व कर्मचारी हे उशीराने पोहचल्याने आमदार आवाडे यांनी सर्वांची कानउघडणी करत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच लवकरच पुन्हा आढावा बैठक घेण्याबाबतही सूचना केली होती.
त्यानुसार आमदार राहुल आवाडे हे मंगळवारी सकाळी 9 वाजून 58 मिनिटांनी थेट पुरवठा कार्यालय येथे आले. त्यावेळी त्यांना कामकाजाची वेळ झाली तरी कार्यालय बंदच असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आमदार आवाडे यांनी थेट प्रांताधिकारी आणि अप्पर तहसिलदार यांना व्हिडीओ कॉल करत कार्यालयाच्या स्थितीची माहिती दिली. तर अप्पर तहसिलदार शेरखाने हे तातडीने पुरवठा कार्यालयात आले व त्यांनीही पाहणी केली असता कार्यालय बंद असल्याचे अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.
त्यावर आमदार आवाडे यांनी प्रभारी नायब तहसिलदार पोळ यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आणि अन्य अधिकारी व कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत सूचना केल्या. त्यावर अप्पर तहसिलदार शेरखाने यांनी आमदार आवाडे यांनी केलेल्या सूचनांबाबत जिल्हाधिकार्यांकडे शिफारस पाठवत असल्याचे सांगितले.
आमदार आवाडे यांनी पुरवठा कार्यालयातील अनागोंदी आणि बेफिकीर कामाला लगाम घालण्यासाठी घेतलेली भूमिका जनतेसाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यालयाचे कामकाज सुरळीत होईल आणि गोरगरीब नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी संगांयो समिती अध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या, बाळासाहेब कलागते, संजय केंगार, राजू बोंद्रे, कोंडीबा दवडते, सुखदेव माळकरी, तात्या कुंभोजे, नितेश पवार, बंडा मुळीक, मिंटु सुरवसे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment