सेवेमुळे अहंकार नष्ट होतो : श्याम पानेगावकर.

 सेवेमुळे अहंकार नष्ट होतो : श्याम पानेगावकर.

---------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

---------------------------------- 

वाई: राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सेवेचे महत्व समजते. अशा शिबिरातून साफसफाई करतानाच सेवेचे व्रत अंगी बाणवायचे असतात. समाजसेवेसाठी मनाची तीव्र इच्छा असावी लागते व त्यासाठी अहंकारही सोडावा लागतो, कारण सेवेमुळे अहंकार नष्ट होतो असे प्रतिपादन वाई पोलिस स्टेशनचे पोलिस उपअधीक्षक श्याम पानेगावकर यांनी केले.

येथील किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या धावडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. संस्थेचे संचालक केशवराव पाडळे यांची विशेष उपस्थिती होती.

याप्रसंगी सरपंच वनिता ननावरे, उपसरपंच अनिल मांढरे, कला विभागाचे उपप्राचार्य व एन. एस. एस. चे सल्लागार प्रा.डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. राजेश गावित, विलास मांढरे, सुनील मांढरे, अरविंद मांढरे, मुख्याध्यापक सुनील शेलार, सागर मांढरे, प्रसाद शिंदे, समर्थ मांढरे, कॅप्टन डॉ. समीर पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, डॉ. मृणालिनी वाईकर,  प्रतिक्षा मांढरे यांची उपस्थिती होती.

श्याम पानेगावकर म्हणाले, आपला देश तरुणांचा देश आहे व तुम्ही भारताचे भावी शिलेदार आहात. आपला महाराष्ट्र तर नररत्नांची खाण आहे. त्यांचे पाईक होण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्या देशाला व राज्याला मोठी परंपरा आहे. ती डोळ्यासमोर ठेवून जीवन जगताना वेगळी वाट निवडा. कोणत्याही गर्दीचा भाग बनण्यापेक्षा दर्दी बनून जीवन समृद्ध करा. आपले बोलणे, वागणे व बसण्यातूनही संस्कार दिसून येतात. आलेली कोणतीही संधी दवडू नका. आयुष्यात ध्येय ठेवून मार्गक्रमण करत रहा. पालकांनीही आपल्या पाल्यांना संस्काराचे महत्त्व सांगावे.

संस्थेचे संचालक केशवराव पाडळे यांनी शिबिरात चांगले काम केल्याबद्दल स्वयंसेवकांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उपसरपंच अनिल मांढरे म्हणाले, शिबिरातील एन. एस. एस. च्या स्वयंसेवकांनी गावाच्या मुख्य पाणीपुरवठ्याच्या विहिरीलगत कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्याने आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. स्वयंसेवकांनी शिबिरातील प्रत्येक दिवसाच्या प्रबोधनपर व्याख्यानातील एक- एक विचार जरी घेतला तरी ते समृद्ध होऊ शकतात. 

विलास मांढरे व एन. एस. एस. चे सल्लागार प्रा.डॉ. चंद्रकांत कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. रोहन भोसले व श्रावणी जाधव या शिबिरात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी, शिबिरातील अनुभवाने आमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाल्याची भावना व्यक्त केली. शिबिरात उत्कृष्ट काम केल्याबद्दल विलास चोरट व राणी सणस यांचा आदर्श स्वयंसेवक म्हणून सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे म्हणाले, धावडी गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वी झाले. शिबिराच्या निमित्ताने स्वयंसेवकांना संस्कार मिळाले. या संस्काराच्या बळावर ते जीवनात आपली वेगळी वाट निर्माण करतील.  

कार्यक्रमास डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. आनंद घोरपडे, सुमंत सावंत, सुरज यादव, सोमिनाथ सानप, जितेंद्र चव्हाण, अनिकेत पिसाळ यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. कॅप्टन डॉ. समीर पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमास स्वयंसेवक व धावडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.