वीज ग्राहकांसाठी आज(दि.२८) सौर ऊर्जा जनजागृती मेळावा.
वीज ग्राहकांसाठी आज(दि.२८) सौर ऊर्जा जनजागृती मेळावा.
------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
------------------------------
मेळाव्याचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन.
*, दि. २७ जानेवारी २०२५ :* केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून प्रधानमंत्री सूर्य घर योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजना राबवण्यात येत आहेत. या अनुषंगाने वीज ग्राहकांकडून सौर ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महावितरण व सोलर बीएनआय या सामाजिक संस्थेकडून संपूर्ण राज्यात जनजागृतीचा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जनजागृतीचा हा मेळावा आज (दि.२८ जानेवारी) रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत हॉटेल अयोध्या, ताराराणी चौक (कावळा नाका) कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश सौर ऊर्जेच्या फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करणे व शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेद्वारे केंद्र सरकार छतावर सौर प्रणाली बसवणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अनुदान देते. मेळाव्यातून या योजनेचे फायदे, अर्ज प्रक्रिया, शासकीय अनुदान आणि शाश्वत भविष्य याबद्दल माहिती दिली जाणार आहे. याप्रसंगी सौर ऊर्जा प्रणाली बसवणाऱ्या तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार असून यावेळी महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधीही वीज ग्राहकांना उपलब्ध असणार आहे.
हा कार्यक्रम घरमालक, व्यावसायिक तसेच सौर ऊर्जा स्वीकारण्यास इच्छुक असणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. कोल्हापूर व परिसरातील नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. वीज ग्राहक अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयकांशी 7770024466 या क्रमांकावर संपर्क साधु शकतात.
Comments
Post a Comment