सावित्रीबाई फुले यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजकार्य केले: डॉ. मंजुषा इंगवले.
सावित्रीबाई फुले यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजकार्य केले: डॉ. मंजुषा इंगवले.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनभर सामाजिक विरोध पत्कारून सर्वसामान्य लोकांसाठी जीवन व्यथित केले. सावित्रीबाई फुले यांनी महिलांचे शिक्षण व सबलिकरणावर भर दिला. त्या शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला होत्या. त्यांनी महिलांना सामाजिक बंधनातून मुक्त केले. मुलींना शिक्षणासाठी दरवाजे खुले केली. या समाज परिवर्तनाच्या क्रांतिकारी कार्यात महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना खंबीर साथ दिली. सावित्रीबाईंचे विचार व कार्य प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन किसन वीर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंजुषा इंगवले यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे होते.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समिती व ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले: जीवन वाचन' या विषयावर त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंतराव कणसे, श्री. भिमराव पटकुरे, प्रो. डॉ. सुनील सावंत, प्रो. डॉ. ज्ञानदेव झांबरे, प्रो. डॉ. भानुदास आगेडकर, प्रो. डॉ. विनोद वीर, डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. अंबादास सकट, डॉ. धनंजय निंबाळकर, डॉ. संग्राम थोरात डॉ. राजेश गावित. श्री बाळासाहेब टेमकर, श्री. विशाल महांगडे यांची विशेष उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, डॉ. मंजुषा इंगवले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे डॉ. मंजुषा इंगवले म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले व महात्मा फुले हे शिक्षण क्षेत्रातील आदर्श दांपत्य होते. ते शिक्षणास सर्वश्रेष्ठ धन समजत असत. त्यांनी गरीब, पीडित, वंचितांच्या शिक्षणासाठी गृहत्याग केला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी रात्रशाळा देखील सुरू केली. त्यांनी विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथ बालकांसाठी बालकाश्रम सुरू केले. स्री शिक्षणाचे पवित्र कार्य चालू ठेवल्यामुळे त्यांनी काही समाजकंटकांकडून चिखलफेक व दगडाचा मारा सहन केला, मात्र सामाजिक कार्य थांबवले नाही. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या आदर्श शिक्षिका आहेत.
अध्यक्षस्थानावरून बोलत असताना डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी भारतात शैक्षणिक क्रांती घडवली. त्या कर्तव्यदक्ष, धाडसी व कुटुंबवत्सल होत्या. त्यांनी समाजकंटक व अपशब्द वापरणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांनी जात-पात, अंधश्रद्धा व कर्मकांडातून समाजास मुक्त करण्याचे काम केले. सावित्रीबाई फुले या स्वच्छ चारित्र्य, उच्च विचारसरणी व सर्वसामान्य जनतेबद्दल कळवळा, तळमळ असणाऱ्या समाजसेविका होत्या. त्यांनी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. आपण सर्वांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान विशद केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राहुल तायडे, श्री. भानुदास चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment