“ स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊं हे सूज्ञ, चाणाक्ष, हुशार विधिज्ञ, सर्वसामान्यांना न्याय देणारे न्यायाधिश हो
“ स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊं हे सूज्ञ, चाणाक्ष, हुशार विधिज्ञ, सर्वसामान्यांना न्याय देणारे न्यायाधिश होते.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
अँड. अजित केंजळे वाई : दि.१८/०१/२०२५ " स्व.भांऊनी जे कार्य केले ते कार्य कायद्याच्या चौकटीत राहूनच केले आहे. म्हणूनच सर्वच स्तरातील लोक त्यांचा प्रचंड आदर करत. स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी म्हणून राजकिय व सामाजिक क्षेत्रात जी उंची भाऊंनी गाठली त्याला तोड नाही. याचा अनुभव मला त्यांच्या सहवासात असताना उच्च न्यायालय मुंबईपासून ते सर्वोच्च न्यायालय, दिल्लीपर्यंत आला. स्व.भाऊंचा सहवास मला खूप कमी वयातच लाभला. भाऊंनी माझ्यावर नितांत प्रेम केलं त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. नि:संशय, निःस्वार्थ सेवाभावी वृत्ती ठेवून; अखेरच्या श्वासापर्यंत जनताजनार्दनाच्या सेवेसाठी त्यांनी आपला देह झिजवला. असा नेता महाराष्ट्राच्याच काय पण देशाच्या राजकारणात होणे नाही. भाऊंना शेती आणि शेतकऱ्यांविषयी प्रचंड आस्था होती. त्यांच्या कष्टाचा सन्मान भाऊं नेहमीच करायचे म्हणून विविध कार्यक्रमांमध्ये भेटवस्तू म्हणून फळांची पेटी, विविध प्रकारच्या फळांफुलांची रोपटी ते सन्मानाने देत. भाऊंच्या संदर्भात खूप मोठा आदरभाव सामाजिक, राजकिय क्षेत्रात होता. स्व. भाऊंच्या स्मरणशक्तीला मी खरोखर सलाम करतो." असे मत अँड.अजित केंजळे यांनी केले.
येथील किसन महाविद्यालयाच्या वतीने जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त स्व. प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांच्या आठव्या मासिक पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांची विशेष उपस्थिती होती तर प्रसिद्ध वकील अँड. जयवंतराव केंजळे, श्री. शंकरराव गाढवे, श्री. रोहिदास पिसाळ, प्रा. रमेश डुबल, श्री. गणेश चव्हाण, श्री. विजय वाघ, श्री. राजेंद्र शिर्के, श्री. दिपक ननावरे, श्री. विजय ढेकाणे, वरिष्ठ महाविद्यालयातील तीनही शाखांचे उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, श्री. भिमराव पटकुरे, प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट, किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव हे मान्यवर तसेच स्व. भाऊंवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अँड. केंजळे पुढे म्हणाले की, “भाऊंकडे प्रचंड बुद्धीमत्ता होती. भाऊंनी कधीही, कुणावरही दबावाचं राजकारण केलं नाही. म्हणूनच कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असो की मंत्री असो भाऊंबद्दल अत्यंत आदराने, प्रेमानेच ते बोलत. भाऊंकडे कायद्याविषयीचे वस्तुनिष्ठ ज्ञान होते. ‘वकिलांवर विश्वास ठेवून; कायदेशीर गोष्टी लढल्या पाहिजेत.’ असे त्यांचे ठाम मत होते. एक माणूस म्हणून स्व.भाऊंचं व्यक्तिमत्व खूप मोठं होतं. व्यक्तिगत पातळीवर भाऊंनी केलेले उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. सार्वजनिक जीवनात भाऊ नेहमी काटेकोरपणे वागत. समाजापरी कृतज्ञतेची भावना भाऊंनी कायम ठेवली."
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, “ स्व.भाऊंचं व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते. भाऊंचा सहवास मला खूप कमी मिळाला परंतु भाऊं हे रत्नपारखी होते हे नक्की. वक्तशीरपणा, निटनेटकेपणा, चाणाक्ष, अभ्यासू, स्वच्छ चारित्र्य असे विविध गुण भाऊंच्या व्यक्तिमत्वात होते. भाऊंनी स्वतःच्या जीवनामधून जो आदर्श समाजासमोर ठेवला आहे, त्यामधून आपणाला खूप काही घेण्यासारखं आहे. भाऊंचे आदर्श विचार पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या व्याख्यानमालेच आयोजन केलेले आहे आणि ते सार्थक होईल अशी आशा मला आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. प्रतापराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. अंबादास सकट यांनी केले. प्रमुख वक्त्याची ओळख अँड. जयवंतराव केंजळे यांनी करून दिली. उपस्थित सर्वांचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रंसगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment