2095 वीज ग्राहकांची 'बत्ती गूल'महावितरणने परिमंडलात ल बिले थकल्याने जोडणी केली खंडित.
2095 वीज ग्राहकांची 'बत्ती गूल'महावितरणने परिमंडलात ल बिले थकल्याने जोडणी केली खंडित.
-------------------------------
कोल्हापूर. प्रतिनिधी
-------------------------------
*कोल्हापूर परिमंडळ 28 फेब्रुवारी 2025 :* वीजबिलांची शंभर टक्के वसुली करण्यासाठी 'महावितरण' नेहमीच प्रयत्नशील असते. वीजबील भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ खंडीत करण्याची मोहीम 'महावितरण'ने हाती घेतली आहे. गेल्या 26 दिवसांत कोल्हापूर परिमंडलातील तब्बल 2 हजार 95 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 680 तर सांगली जिल्ह्यातील 1415 ग्राहकांचा समावेश आहे.
थकबाकीसह चालू महिन्याचे वीजबील वसूल करणे 'महावितरण'समोर एक आव्हानच असते. त्यामुळे आर्थिक वर्षातील शेवटच्या दोन महिन्यात 'महावितरण'ने वीजबील वसुलीसाठी ठाम भूमिका घेतली आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील कोल्हापूर परिमंडलाच्या वीजग्राहकांकडे जानेवारी अखेर 64 कोटी 70 लाख रुपयांची थकबाकी असून फेब्रुवारी महिन्याची 258 कोटी 56 लाख रुपयांची मागणी आहे. थकबाकी व मागणी असे एकत्रित 323 कोटी 26 लाख रुपयांची वसुली फेब्रुवारी अखेरपर्यंत करावयाची आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 219 कोटी 6 लाख रुपय तर सांगली जिल्ह्यातील 104 कोटी 21 लाख रुपये रकमेचा समावेश आहे. गेल्या 26 दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून 167 कोटी 81 लाख रुपये वसूल झाले आहेत. तसेच, सांगली जिल्ह्यातील वीजग्राहकांकडून 65 कोटी 09 लाख रुपये वसूल झाले आहेत.
*वीजबिल वसुलीसाठी वरीष्ठ अधिकारीही फिल्डवर*
थकबाकी वसुलीसाठी जनमित्रांसह कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता हे वरिष्ठ अधिकारीही वीजबील वसुलीसाठी फिल्डवर फिरत आहेत. वसुली मोहीम मार्च अखेरपर्यंत प्रभावीपणे राबवण्यात येणार असून वीजग्राहकांनी चालू बिलांसह थकबाकीचाही भरणा करावा, अन्यथा थकबाकीदार ग्राहकांना कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा 'महावितरण'ने दिला आहे. दरम्यान, कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या वीजग्राहकांना अभय योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे.
--------------------------
Comments
Post a Comment