किसन वीर महाविद्यालयात प्रा. वसंतराव जगताप व डॉ. प्रकाश सावंत यांना श्रद्धांजली अर्पण.
किसन वीर महाविद्यालयात प्रा. वसंतराव जगताप व डॉ. प्रकाश सावंत यांना श्रद्धांजली अर्पण.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
वाई दि. ०३/०२/२०२५ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात जनता शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्रा. वसंतराव जगताप यांचे दिनांक ०२/०२/२०२५ रोजी तर महाविद्यालयातील माजी भूगोल विभागप्रमुख डॉ. प्रकाश सावंत यांचे दिनांक २८/०१/२०२५ रोजी निधन झालेने जनता शिक्षण संस्था व किसन वीर महाविद्यालय परिवारातर्फे दोघांनाही भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे विद्यमान सचिव डॉ. जयवंत चौधरी यांचे महाविद्यालयात श्रद्धांजलीपर मनोगत आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. हणमंतराव कणसे, श्री. भिमराव पटकुरे, डॉ. अंबादास सकट उपस्थित होते.
डॉ. जयवंत चौधरी म्हणाले की प्रा. वसंतराव जगताप हे केंजळ गावचे सुपुत्र होते. त्यांचे जनता शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये महत्वाचे योगदान होते. दि. १२ जुलै १९६७ रोजी जनता शिक्षण संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या स्थापनेची व नोंदणीची सर्व औपचारिकता प्रा. वसंतराव जगताप यांनी पार पाडली. संस्थेचे संस्थापक कै आबासाहेब वीर यांचे ते विश्वासू होते, त्यामुळे त्यांची सचिव पदी नियुक्ती झाली. प्राज्ञपाठशाळामंडळाकडून जेव्हा महाविद्यालय जनता शिक्षण संस्थेकडे हस्तांतरीत झाले तेव्हा जगताप सरांनी सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली.
मराठा इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ते उत्तम वक्ते होते. शिवचरित्रावर त्यांची अनेक व्याख्याने आयोजित केली जात होती. स्पर्धा परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत. निवृत्तीनंतरही संस्थेचे सदस्य व हितचिंतक म्हणून सहभागी होत असत. त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता.
डॉ. जयवंत चौधरी पुढे म्हणाले की, डॉ. प्रकाश सावंत यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून उत्तम काम केले. महाविद्यालयातील भूगोल विभाग समृद्ध करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांचे लिखाण एकटाकी होते. त्यांनी भूगोल व पर्यावरणविषयक एकूण ४२ पुस्तके लिहिली आहेत. तसेच वाई येथील मराठी विश्वकोशासाठी लिखाण केले. संस्था व महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये दोन्हीही महनीय व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रा. वसंतराव जगताप व डॉ. प्रकाश सावंत, दोघांचेही कार्य स्मरणात राहील.
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी कै. वसंतराव जगताप कै. डॉ. प्रकाश सावंत यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे म्हणत शोक व्यक्त केला.
त्यांनतर सभागृहातील सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून एकत्रित श्रद्धांजली वाहिली. स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक केले. यावेळी कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment