कामे करूनही एक - दीड वर्ष बिले मिळत नाहीत ठेकेदाराने काय आत्महत्या करायची का?
कामे करूनही एक - दीड वर्ष बिले मिळत नाहीत ठेकेदाराने काय आत्महत्या करायची का?
---------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
कोल्हापूर : कामे करूनही एक - दीड वर्ष बिले मिळत नाहीत,मार्चमध्ये वसुलीसाठी बँकांची पथके घरात येत आहेत. सरकार पैसे देत नाही, मग ठेकेदारांनी काय जीव द्यायचा काय? असा संतप्त सवाल करत ठेकेदारांनी केला. बिले काढली नाहीत तर पुढचे काम कसे करायचे, अशी विचारणाही करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने थकित बिलांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी जोरदार निदर्शने केली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले.
ठेकेदारांची बिले मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. वर्षभरापासून पैसे दिले नाहीत. त्यामुळे ठेकेदार महासंघाने आंदोलने केली आहेत. सार्वजनिक बांधकाम भवन परिसरात वाहनांसह मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. मात्र केवळ सात टक्के पैसे देऊन तोंडाला पाने पुसली, असा आरोप यावेळी केला. शासनाचा निषेध करण्यासाठी कंत्राटदारांनी सोमवारी निदर्शने केली. बिले थकविणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बिलाचे पैसे हक्काचे, अशा घोषणा दिल्या. व्ही. के. पाटील म्हणाले, दीड वर्षापासून विकासकामे करूनही पैसे दिले नाहीत, काही जणांना सात टक्के रक्कम दिली. ही रक्कम अतिशय तुटपुंजी असून यातून बँकेचे व्याजही जात नाही. बिले मिळाली नाही तर पुढील वर्षी कामे करता येणार नाहीत. शिवाजी काशीद म्हणाले, आम्ही विकास कामे करायची, नेत्यांनी उद्घाटन करायचे, त्याच्या बिलाची जबाबदारी मात्र कोणी घेत नाही. आमचे बँक खाते एनपीएमध्ये गेले आहे. मार्च महिन्यात वसुली पथके घरात येत आहेत. ठेकेदारांवर आत्महत्या करायची वेळ आली आहे.लाडक्या बहिणींना शासनाने दरमहा पैसे दिले. आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत. शासनाने बिले काढली नाहीत तर कोणतेही विकासकाम करणार नाही, असा इशारा विजय सावंत यांनी दिला. सरकारने ठेकेदारांचा अंत पाहू नये, अशी विनंती आहे. अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ठेकेदार महासंघाचे राज्य सचिव सुनील नागराळे यांनी दिला. आंदोलनात सुनील नागराळे, संजीव सृष्टी, गौरव सावंत, उपस्थित होते.
विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment