फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रच्या बातमीची दखल; कुपवाड–मिरज पुलाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रच्या बातमीची दखल; कुपवाड–मिरज पुलाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
कुपवाड | प्रतिनिधी : राजू कदम.
कुपवाड–मिरज मुख्य मार्गावरील पुलावरील धोकादायक खड्डे आणि तुटलेले संरक्षक कठडे याबाबत फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रने बातमी प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. तसेच पुलाच्या बाजूचे संरक्षक कठडे खराब झाल्याने अपघाताचा धोका वाढला होता. या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार आवाज उठवला होता.
परिवहन सभापती तथा नगरसेवक प्रकाश पाटील आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने हालचाल करत पुलावरील खड्डे बुजविण्याचे आणि संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. याचबरोबर कुपवाड–मिरज मुख्य रस्त्यावरील इतर खड्डेही भरले जात आहेत.
दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने या मार्गावरील हजारो वाहनचालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, हे काम तात्पुरते न करता दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रने मांडलेल्या जनहिताच्या प्रश्नाची प्रशासनाने दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पुढील कामही गुणवत्तापूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments: