Header Ads

मिरज पूर्वेत मध्यरात्री रक्तरंजित थरार! सराईत गुन्हेगार ‘माऊली’चा धारदार शस्त्रांनी निर्घृण खून

 मिरज पूर्वेत मध्यरात्री रक्तरंजित थरार! सराईत गुन्हेगार ‘माऊली’चा धारदार शस्त्रांनी निर्घृण खून

सोनी-पाटगाव रस्त्यावर दबा धरून हल्ला; पूर्ववैमनस्य किंवा टोळीयुद्धाचा पोलिसांचा संशय, हल्लेखोरांचा शोध सुरू

मिरज तालुक्यातील सोनी-पाटगाव परिसरात शनिवारी (८ ऑगस्ट) रात्री उशिरा खुनाची धक्कादायक घटना घडली. ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामदास पाटील या सराईत गुन्हेगारावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे मिरज पूर्व भागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनी-पाटगाव रस्त्यावरील परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी दबा धरून माऊली पाटील याच्यावर अचानक हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, हा खून पूर्ववैमनस्यातून किंवा टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास सुरू असून परिसरातील हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

घटनेनंतर सोनी-पाटगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, या खुनामागील नेमके कारण काय आणि हल्लेखोर कोण? याचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार आहे.

No comments:

Powered by Blogger.