शिवसेनेच्या गड-किल्ले स्पर्धेतून उंचगावात जागणार शिवइतिहासाचा वारसा!
शिवसेनेच्या गड-किल्ले स्पर्धेतून उंचगावात जागणार शिवइतिहासाचा वारसा!
बालचिमुकल्यांसह मंडळांनाही सहभागाचे आवाहन; प्रथम क्रमांकासाठी ३ हजार १ रुपयांचे पारितोषिक.
उंचगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली नाळ नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर तालुक्याच्या वतीने यंदाही भव्य गड-किल्ले बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उंचगाव मर्यादित असणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त बालचिमुकल्यांनी आणि मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केले आहे.
गेली तीन वर्षे शिवसेनेच्या वतीने ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. यंदाही स्पर्धेची परंपरा कायम राखत आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, स्पर्धेची प्रवेश फी केवळ एक रुपया ठेवण्यात आली असून, प्रत्येकाला आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ३ हजार १ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार १ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी १ हजार ५०१ रुपये व सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी १ हजार १ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट सादरीकरणासाठी विशेष सन्मानचिन्हही दिले जाणार आहे.
उंचगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजू यादव म्हणाले, "गड-किल्ले ही केवळ मातीची प्रतिकृती नसून ती आपल्या शौर्याची, पराक्रमाची आणि स्वाभिमानाची जिवंत प्रतीके आहेत. मुलांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले कलागुण दाखवावेत. जास्तीत जास्त मंडळांनीही सहभाग नोंदवून शिवइतिहासाचा वारसा जपावा आणि मातीशी असलेली आपली नाळ अधिक घट्ट करावी."
एक रुपयात इतिहास घडविण्याची संधी!
मोठ्या खर्चाची गरज नसताना आपल्या कल्पकतेतून गड-किल्ल्यांची निर्मिती करण्याची ही संधी उंचगावातील मुलांसाठी आणि मंडळांसाठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे केवळ स्पर्धा म्हणून नव्हे, तर शिवरायांच्या इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून देणारा उपक्रम म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी व संपर्क
१) योगेश लोहार – ८६६८५४४४८२
२) शरद माळी – ९८२३३९१११३
३) सुनील चौगुले – ९८६०७८२८७२
४) बाळासो नलवडे – ९१४६८६४३५८
५) सचिन नागटिळक – ९८८१५६३५७५
६) प्रफुल्ल घोरपडे – ९७६६१०६४६४
शिवइतिहास जपूया, गड-किल्ल्यांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया!

No comments: