Header Ads

कोल्हापुरात ‘दम मारो दम’ गँगला मोका! पाच अट्टल गुन्हेगार जेरबंद

 कोल्हापुरात ‘दम मारो दम’ गँगला मोका! पाच अट्टल गुन्हेगार जेरबंद - राजाराम तलाव परिसरातील जबरी चोरीचा गुन्हा; टोळीप्रमुखासह पाच जणांवर संघटित गुन्हेगारीविरोधी कारवाई.


कोल्हापूर | प्रतिनिधी – रहिम पिंजारी

शहरासह उपनगरांत शस्त्रांचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्या ‘दम मारो दम’ टोळीला पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. टोळीप्रमुख सुनील वाळकुंजे याच्यासह पाच अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या कारवाईस पूर्वपरवानगी दिली आहे.

२७ सप्टेंबर रोजी राजाराम तलाव परिसरात एका वाटसरूला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना संघटित गुन्हेगारी टोळीचे धागेदोरे समोर आले.

अटक केलेले आरोपी : सुनील वसंत वाळकुंजे (टोळीप्रमुख), रोहित रघुनाथ जाधव, प्रफुल्ल सर्जेराव गजबरे, साद फारुक बेपारी आणि रोहन रुपेश पाटील. सर्व आरोपी सध्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

सोन्याची साखळी अन् दोन दुचाकी जप्त! पोलिसांनी ७७ हजार ५०० रुपये किमतीची ८.१६० ग्रॅम सोन्याची साखळी तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

टोळीतील सदस्यांवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, घरफोडी आणि प्राणघातक शस्त्रांचा वापर अशा गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे. आर्थिक फायद्यासाठी निर्जन रस्त्यांवर वाटसरूंना लक्ष्य करून लुटणे, हा टोळीचा मुख्य उद्देश असल्याचे तपासात समोर आले आहे.

राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी मोका कारवाईचा प्रस्ताव तयार केला. स्थानिक गुन्हे शाखा आणि राजारामपुरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे शहरातील संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का बसला आहे.

No comments:

Powered by Blogger.