जेवणानंतर काळरात्र! विहिरीत पडून दोन नर्सिंग विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; ईश्वरपुरात हळहळ
जेवणानंतर काळरात्र! विहिरीत पडून दोन नर्सिंग विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; ईश्वरपुरात हळहळ
मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली दुर्घटना; पाय घसरल्याने विहिरीत पडल्याची प्राथमिक माहिती, स्पेशल रेस्क्यू फोर्सने बाहेर काढले मृतदेह.
ईश्वरपूर | प्रतिनिधी
जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले आणि काही वेळातच काळाने घाला घातला! ईश्वरपूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत बुडून दोन नर्सिंग विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. प्रशांत पाटील (वय २५, रा. जळगाव) आणि गंगाधर रमेश सुकुरवार (वय २४, रा. नांदेड) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे ईश्वरपूर परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते. जेवण झाल्यानंतर रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ते बाहेर आले. यावेळी जवळील विहिरीच्या परिसरात गेले असता अचानक पाय घसरून दोघेही विहिरीतील पाण्यात पडले. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्पेशल रेस्क्यू फोर्सची धाव; दोन्ही मृतदेह बाहेर
घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले. सिनियर कमांडर कैलास वडर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर विहिरीतून दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्रकाश हॉस्पिटलमध्ये घेत होते नर्सिंगचे शिक्षण
मृत प्रशांत पाटील आणि गंगाधर सुकुरवार हे दोघेही ईश्वरपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होते. शिक्षणासाठी घरापासून दूर आलेल्या या दोन्ही तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या बचाव मोहिमेत कैलास वडर, महेश गव्हाणे, अमीर नदाफ, इर्शाद कवठेकर आणि सागर जाधव यांनी सहभाग घेतला.
दोन तरुणांचे आयुष्य संपले, कुटुंबीयांच्या स्वप्नांवर पाणी!
नर्सिंगचे शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दोन तरुणांचा एका दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. या घटनेने ईश्वरपूरसह जळगाव आणि नांदेडमधील त्यांच्या परिचितांमध्ये शोक व्यक्त होत आहे.

No comments: