Header Ads

परीक्षेला जाताना विद्यार्थिनीचा पाठलाग; हात पकडून धमकी!

 परीक्षेला जाताना विद्यार्थिनीचा पाठलाग; हात पकडून धमकी!

‘बोलली नाहीस तर AI च्या माध्यमातून अश्लील फोटो व्हायरल करेन’; राधानगरीत १८ वर्षीय तरुणावर पोक्सो, ॲट्रॉसिटीचा गुन्हा

दोन वेगवेगळ्या दिवशी छेडछाडीचा आरोप; सोशल मीडियावरील बदनामीच्या धमकीने खळबळ.


कोल्हापूर | प्रतिनिधी विजय बकरे.

शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राधानगरी तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन वेगवेगळ्या दिवशी पाठलाग करून तिचा हात पकडल्याचा तसेच AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राशिवडे बुद्रुक येथील १८ वर्षीय तरुणाविरोधात राधानगरी पोलिसांत पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेपर संपल्यानंतर पाठलाग करून हात पकडल्याचा आरोप

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी दहावीचा हिंदीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थिनी बहिणीसोबत घरी जात होती. दुर्गमानवाड येथील महाविद्यालयापासून सुमारे १०० मीटर अंतरावर आरोपीने दुचाकीवरून तिचा पाठलाग करून तिला अडवले. यावेळी तिचा हात पकडून धमकी दिल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने हात सोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

AI च्या माध्यमातून अश्लील फोटो तयार करण्याची धमकी

३० ऑक्टोबर रोजी इंग्रजीचा पेपर संपल्यानंतरही त्याच ठिकाणी आरोपीने पुन्हा पाठलाग केल्याचा आरोप आहे. 'तू माझ्याशी बोलत नाहीस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. अन्यथा ChatGPT च्या माध्यमातून तुझे अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करेन,' अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोक्सो, ॲट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा

या प्रकरणी राजवर्धन सुरेश परीट (वय १८, रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी) याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेची कलमे ७५(२), ७८(२), ७९, १२६(२), ३५१(३), पोक्सो कायद्याची कलमे ८ व १२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे ३(१)(w)(i), ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला 

३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी गुन्ह्याची नोंद झाली. महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार या दाखल अधिकारी असून, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण गिल्डा तपास करीत आहेत.

AI तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा गंभीर मुद्दा ऐरणीवर

अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग, धमकी आणि AI च्या माध्यमातून अश्लील प्रतिमा तयार करून बदनामी करण्याच्या धमकीमुळे राधानगरी परिसरात खळबळ उडाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मुलींना धमकावण्याच्या प्रकारांबाबत पालक आणि विद्यार्थिनींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.