Header Ads

उचगांव–गडमुडशिंगी पाणंद रस्त्याच्या डांबरीकरणासाठी शिवसेनेचा इशारा; अन्यथा ‘रस्ता रोको’

 उचगांव–गडमुडशिंगी पाणंद रस्त्याच्या डांबरीकरणासाठी शिवसेनेचा इशारा; अन्यथा ‘रस्ता रोको’

-----------------------

शशिकांत कुंभार.

-------------------------

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उचगांव येथून शेतवडी मार्गे गडमुडशिंगीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या पाणंद रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागामार्फत या रस्त्याचे काम सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू झाले होते. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात खडीकरण करण्यात आले; मात्र त्यानंतर आवश्यक असलेले डांबरीकरण अद्याप झालेले नाही. या मार्गावरून उचगांव परिसरातील शेतकरी, नागरिक तसेच गडमुडशिंगीकडे जाणारी मोठी वाहतूक सुरू असते.

उचगांव हायवे पुलाखालील गोल्डस्टार परिसरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्ग म्हणून या पाणंद रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था अधिकच गंभीर बनली असून अपघाताचा धोका वाढला आहे.

याबाबत बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, या मार्गावर न्यू पॉलिटेक्निक महाविद्यालय असल्याने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. तसेच शेतकऱ्यांची शेतीही या रस्त्यालगत असल्याने सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे तातडीने डांबरीकरण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल.

दरम्यान, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामविकास विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या नावे देण्यात आले. संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याने लेखाधिकारी प्रदीप सकटे यांनी निवेदन स्वीकारले. रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

या प्रसंगी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, कैलास जाधव, दत्ता फराकटे, सचिन नागटिळक, दीपक अंकल, सुनील पारपानी, बाबुराव पाटील, अजित चव्हाण, रामराव पाटील, कृष्णा तुरुके, अजित रोटे, शरद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.