चारचाकी वाहन आडवे लावण्याच्या वादातून हरिपूरच्या तरुणाचा कोथळीत खून; संशयित पोलिसांच्या ताब्यात.
चारचाकी वाहन आडवे लावण्याच्या वादातून हरिपूरच्या तरुणाचा कोथळीत खून; संशयित पोलिसांच्या ताब्यात
जयसिंगपूर / सांगली (प्रतिनिधी):
चारचाकी वाहन आडवे मारण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोथळी (ता. शिरोळ) येथे घडली. विकास बाबूराव बोंद्रे (वय ४५, रा. हरिपूर, ता. मिरज, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल (वय ३६, रा. कोथळी) याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मृत विकास बोंद्रे हे मंगळवारी कामानिमित्त कोथळी परिसरात आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास कोथळी गावात चारचाकी वाहन आडवे मारण्याच्या कारणावरून बोंद्रे आणि संशयित आरोपी अभिनंदन पाटील-धडेल यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात संशयित आरोपीने आपल्याकडील धारदार शस्त्राने विकास बोंद्रे यांच्या गळ्यावर सपासप वार केले.
परिसरात तणाव आणि पोलीस कारवाई
गळ्यावर वर्मी घाव बसल्याने विकास बोंद्रे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कोथळी आणि हरिपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
घटनेनंतर पसार झालेला संशयित आरोपी अभिनंदन पाटील-धडेल हा स्वतःहून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या खुनामागे केवळ वाहनाचा वाद होता की जुने काही वैमनस्य होते, या दिशेने जयसिंगपूर पोलीस कसून तपास करत आहेत.

No comments: