१६ वर्षांचा शिक्षणाला ब्रेक… तरीही जिद्दीचा विजय! माय-लेकराने एकाचवेळी दहावी उत्तीर्ण होऊन राधानगरीत घडवला प्रेरणादायी इतिहास
१६ वर्षांचा शिक्षणाला ब्रेक… तरीही जिद्दीचा विजय!
माय-लेकराने एकाचवेळी दहावी उत्तीर्ण होऊन राधानगरीत घडवला प्रेरणादायी इतिहास.
------------------------
कसबा तारळे प्रतिनिधी :
-------------------------
“वय नाही, तर जिद्द मोठी असते,” याची प्रचिती राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड पैकी राणेवाडी येथील पूजा परशू पाटील यांनी करून दिली आहे. तब्बल १६ वर्षे शिक्षणापासून दूर राहिल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मुलासोबत दहावीची परीक्षा देत घवघवीत यश मिळवले. विशेष म्हणजे माय-लेकराने एकाचवेळी दहावी उत्तीर्ण होऊन परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
मूळच्या चाफोडी (ता. करवीर) येथील पूजा बळवंत सुर्वे यांचा विवाह २००९ साली परशू पाटील यांच्याशी झाला. लग्नानंतर संसार, जबाबदाऱ्या आणि मुलांच्या संगोपनामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. मात्र मनातील शिकण्याची जिद्द त्यांनी कधीही मरू दिली नाही.
दरम्यान, त्यांचा मुलगा यश पाटील दहावीला गेल्यानंतर पूजा पाटील यांनीही पुन्हा पुस्तके हातात घेतली. दिवसातील घरकाम, कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. अखेर माय-लेकराने एकत्र परीक्षा देत यशस्वी झेप घेतली. पूजा पाटील यांनी ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत “इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही,” हे सिद्ध करून दाखवले.
त्यांच्या या यशामागे निवृत्त केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील, प्रा. जयसिंग राणे, मुख्याध्यापक एम. आर. पाटील तसेच महाडिक माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पती परशू पाटील, दोन्ही मुले आणि काका शिवाजी चांदम यांनीही त्यांना खंबीर साथ दिली.
पूजा पाटील यांच्या या यशामुळे राणेवाडी परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक महिलांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.


No comments: