Header Ads

पहाटेच्या अंधारात दुचाकी चोरणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा पर्दाफाश;

 पहाटेच्या अंधारात दुचाकी चोरणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा पर्दाफाश; शाहूपुरी पोलिसांनी तीन मोटारसायकलींसह 1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त

-----------------------
 शशिकांत कुभार.
-----------------------

कोल्हापूर, : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या दुचाकींचा छडा लावत पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नागाळा पार्क परिसरातील रहिवासी कुशल हेमराज सामानी यांच्या घरासमोर उभी असलेली कावासाकी मोटारसायकल 18 जून रोजी पहाटे चोरीला गेली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर बाजार परिसरात शोधमोहीम राबवून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.

त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली कावासाकी मोटारसायकल तसेच यापूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांतील मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यामध्ये बजाज एक्सीडी आणि फॅशन मोटारसायकलचा समावेश आहे.

या कारवाईत एकूण तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत 1.10 लाख रुपये आहे. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे शहरातील दुचाकी चोरीच्या तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस अंमलदार परशराम येकुरकर करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.