दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महापालिकेकडून ‘वन-टाइम’ ऑनलाईन नोंदणी सुविधा सुरू
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महापालिकेकडून ‘वन-टाइम’ ऑनलाईन नोंदणी सुविधा सुरू
भत्ता आणि योजनांचा लाभ मिळणे होणार सुलभ; ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन.
-------------------------कुपवाड / मिरज प्रतिनिधी :
राजू कदम.
--------------------------------
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दिव्यांग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणि उदरनिर्वाह भत्त्याचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना विनाअडथळा मिळावा, यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाभार्थ्यांना भत्ता मागणी अर्ज तसेच हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘दिव्यांग व्यक्ती एकदाच नोंदणी’ (One-Time Registration) हे विशेष ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निश्चित मुदतीत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या नव्या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना वारंवार महापालिकेच्या कार्यालयात जाण्याची गरज कमी होणार असून योजनांचा लाभ अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे.
नोंदणी प्रक्रियेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये अद्ययावत UDID कार्ड आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक असून त्याची मुदत संपलेली नसावी. लाभार्थ्याचे दिव्यांगत्व किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र (असल्यास), आयडेंटी साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला आणि बँकेचे अद्ययावत पासबुक ही कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहेत. आधार कार्डवरील पत्ता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्ती किंवा त्यांच्या पालकांनी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन १ मे २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी. नोंदणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना मिळणारा नोंदणी क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उपायुक्त अश्विनी पाटील यांनी आयुक्त संजीता महापात्र यांच्या मान्यतेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, “दिव्यांग बांधवांना शासकीय कार्यालयात वारंवार येण्याचा त्रास वाचावा आणि योजनांच्या प्रक्रियेत पारदर्शकता वाढावी यासाठी ही ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी नोंदणी पूर्ण करून सहकार्य करावे.”

No comments: