Header Ads

तंबाखू दराने केला दीडशेचा टप्पा पार !तालुक्याच्या सीमाभागात खरेदीची लगबग.

 तंबाखू दराने केला दीडशेचा टप्पा पार !तालुक्याच्या सीमाभागात खरेदीची लगबग.

-----------------------------

कागल प्रतिनिधी 

-----------------------------

कागल : कागल, सीमाभागासह व निपाणी तालुक्यात नगदी पिक म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, त्या तंबाखू पिकाच्या काढणीनंतर आता त्याच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. देशात प्रसिद्ध अशा निपाणी बाजारपेठेचे व्यापारी ही खरेदी करीत आहेत. यंदा कागल तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्यात तंबाखू दर सध्या तरी दीडशेच्या उंबरठ्यावर आहे. सध्या विक्री होत असलेल्या तंबाखूला प्रति किलो १४० ते १४५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक दर आहे. निपाणी तालुक्यासह ग्रामीण भागात कमीत कमी १३० रुपये आणि जास्तीत जास्त १५५ रुपये प्रति किलो दराने खरेदी होत आहे. त्यामुळे तंबाखूने दराचा दीडशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

पूर्वीपासून निपाणी ही तंबाखूची प्रसिद्ध बाजारपेठ आणि सीमाभाग व कागल तालुक्यातील चिकोत्रा खोरे या तंबाखू पिकासाठी खूप प्रसिद्ध आहे. यासाठी लागणारे पोषक वातावरण या विभागात आहे. त्याचप्रमाणे पूर्वी नद्यांना बारमाही पाणी नव्हते, तेव्हा ऊस शेती व तिच्या प्रभावाचा विषयच नव्हता. पण चिकोत्रा, वेदगंगा व दूधगंगा या नद्यांना बारमाही पाणी वाहत असल्याने व सिंचनाच्या सोयी तसेच तंबाखू पिकातील कमालीचा बेभरवशीपणा यामुळे हे नगदी पिक बऱ्याच प्रमाणात कमी होत गेले.

सध्या ऊस शेतीला पालट व आणखी या क्षेत्रासाठी राखीव क्षेत्र यामध्ये तंबाखू पिक घेतले जाते. साधारणपणे फेब्रुवारीअखेरपर्यंत या पिकाची काढणी व त्याची नंतरची सर्व प्रक्रिया होऊन तंबाखू विक्रीलायक करुन भरुन ठेवला जातो. त्यानंतर मग त्याची विक्री सुरु होते. त्यासाठी शेतकरी निपाणी बाजारपेठेशी संपर्क साधत असतात. त्यानुसार आता ही खरेदी सुरु आहे. सध्या तरी हा दर १५५ रुपये किलोपर्यंत असून हा दर आणखी वाढण्याची शक्यता देखील काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

तंबाखू हा पोत्यात नव्हे तर बोदामध्ये भरला जातो. दोन पोत्यांपासून एक बोद तयार केला जातो. या एका बोदात ६० ते ६५ किलो तंबाखू बसतो. पण खरेदी करणारे व्यापारी या एका बोदास येईल ते पूर्ण वजन धरीत नाहीत तर ते प्रतिबोदास ५ ते ६ किलो तूट धरतात. यामध्ये बोदाच्या गोणपटाचे, काडी माती व चोख वजनात देखील येणारी अशी प्रत्येकी २ किलो मिळून एकूण ६ किलो तूट धरली जाते.

अविरत परिश्रम घेऊन शेतकरी तंबाखू विक्रीसाठी भरुन ठेवतात व त्यातील थोडा तंबाखू पुडीत बांधून व्यापाऱ्यांकडे जातात. तेव्हा त्या ठिकाणी त्या तंबाखूचा रंग, जाडी व विशेष करुन तो विडी करुन किंवा चिलमीत घालून ओढून पाहिला जातो आणि मग त्यावर दर ठरतो. गुळाच्या घाण्यावर ज्याप्रमाणे गुळव्या असतो तसे हे तंबाखू ओढून पाहणारे त्यातील तज्ञ व्यक्ती असतात. हे पाहिल्यानंतरच त्याचा दर निश्चित केला जातो.

निपाणी तालुक्यासह सीमाभागात जालना, केरळ, गुजरात, आंध्रप्रदेश, कलकत्ता आदी भागातील व्यापारी स्वतः येऊन व प्रतिनिधीद्वारे तंबाखू मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि प्रतवारीप्रमाणे दर देतात.

No comments:

Powered by Blogger.