Header Ads

कुपवाडमधील सि.स. नं. ७७४ वाद चिघळला : आंबेडकर पुतळा उभारणीला विलंब, ‘स्मृती उद्यान’ प्रस्तावावरून संशयाचे सावट*

 कुपवाडमधील सि.स. नं. ७७४ वाद चिघळला : आंबेडकर पुतळा उभारणीलाविलंब, ‘स्मृती उद्यान’ प्रस्तावावरून संशयाचे सावट

सांगली, प्रतिनिधी : 


कुपवाड शहरातील महावीर व्यायाम मंडळाजवळील सि. स. नं. ७७४ या महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडावरून निर्माण झालेला वाद अधिक तीव्र होत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या मागणीला विलंब लावला जात असल्याचा आरोप बहुजन समाजाकडून केला जात आहे. याच ठिकाणी अचानक “कै. आमदार शरद पाटील स्मृती उद्यान” उभारण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


आमदार कै. शरद पाटील यांच्या स्मृती उद्यानास कोणताही विरोध नसून ते अन्य योग्य ठिकाणी उभारता येऊ शकते.


महानगरपालिका महासभेने यापूर्वीच या जागेवर तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. या संदर्भात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने १ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला लेखी निवेदनही देण्यात आले होते.


मात्र, या मागणीला प्रतिसाद न देता उपमहापौरांनी स्वतंत्ररित्या “स्मृती उद्यान” प्रस्ताव सादर केल्याचे समोर आले आहे. सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीचा प्रयत्न झाल्यानंतर स्थायी समितीत ऐनवेळचा विषय म्हणून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एकाच भूखंडासाठी दोन भिन्न ठराव अस्तित्वात आल्याने प्रशासनिक विसंगती निर्माण झाली असून, पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.


बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, आंबेडकर पुतळा उभारणी टाळण्यासाठीच हा डाव रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.


दरम्यान, २० ऑगस्ट २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयासमोर झालेल्या जनआक्रोश आंदोलनानंतर महापौर, उपमहापौर आणि इतर नगरसेवकांनी आंदोलकांना सकारात्मक आश्वासन दिले होते. प्रभाग क्र. २ च्या नगरसेविका प्राजक्ताताई धोत्रे यांनी हा विषय महासभेत मांडण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.


यामुळे आंदोलकांनी स्पष्ट इशारा देत, जोपर्यंत आंबेडकर पुतळा उभारणीबाबत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत संबंधित भूखंडावर कोणतेही भूमिपूजन, उद्घाटन किंवा काम सुरू करू नये, अशी ठाम मागणी केली आहे. तसेच संपूर्ण निर्णय प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


या पार्श्वभूमीवर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील, विविध संघटना आणि बहुजन समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र येत असून, प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, कुपवाड यांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या भेटीत प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, मोहन साबळे, शिवाजी उर्फ पवन वाघमारे, क्रांती कांबळे, युवराज कांबळे, हिरामण भगत, विवेक तोरवे, गौतम भगत, अनिल मोरे, रूपेश तामगावकर, उल्काताई तामगावकर, बाबासाहेब कांबळे, अशोक लोंढे, वैभव रांजणे, ॲड. श्रीनाथ कांबळे, सागर सावंत, विनायक मोरे, सागर खंडागळे, नविनकुमार कांबळे, अशोक भटकर, सरिता दयानंद कांबळे, जया भगत, शितल कोलप, सुरेखा बळखंडे, नंदकिशोर शिंदे यांच्यासह फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बहुजन समाजातील बांधव उपस्थित होते.


सदर प्रकरण आता केवळ विकासाचा मुद्दा न राहता सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि बहुजन समाजाच्या अस्मितेशी निगडित प्रश्न बनला असून, प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.