अलकुड (एस) शिवारात २१ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मिरज पूर्व भागात खळबळ.
अलकुड (एस) शिवारात २१ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मिरज पूर्व भागात खळबळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कवठेमहांकाळ | प्रतिनिधी : राजू कदम.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एस) शिवारात २१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार, १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. प्रणव प्रकाश कदम (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रणव याचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह अलकुड (एस) गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यासह कपाळ, मान, पाठ आणि हातावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत प्रणवचा मृत्यू झाला.
या खुनामागे शेअर मार्केटमधील गुंतवणूक किंवा पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेला आर्थिक वाद कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिस तपास करत आहेत. मिरज ग्रामीण पोलीस व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.
मिरज पूर्व भागात वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये चिंता
मिरज तालुका व पूर्व भागात सातत्याने घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. तरुणाचा अशा निर्घृण पद्धतीने खून झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा पुरेसा धाक आहे का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून परिसरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
या खुनाचा तपास जलदगतीने करून आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

No comments: