अंबावडे खुर्दमध्ये भरधाव चारचाकीची म्हैसला धडक; म्हैस जखमी.
अंबावडे खुर्दमध्ये भरधाव चारचाकीची म्हैसला धडक; म्हैस जखमी.
भैरोबा मंदिराजवळ अपघात; वाहनाचे नुकसान, चालकाच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी.
अंबावडे खुर्द येथील भैरोबा मंदिराजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाची रस्त्यावर आलेल्या म्हशीला जोरदार धडक बसल्याची घटना घडली. या अपघातात म्हैस जखमी झाली असून चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, भैरोबा मंदिराजवळून चारचाकी वाहन जात असताना रस्त्यावर आलेल्या म्हशीला वाहनाची जोरदार धडक बसली. धडकेनंतर म्हैस रस्त्यावर कोसळली. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमी म्हशीची पाहणी करून तिला सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, मंदिर परिसरात नागरिकांची तसेच भाविकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असतानाही भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी मानवी जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
अपघातानंतर वाहनचालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना आहे का, तसेच वाहनाची आवश्यक कागदपत्रे आहेत का, याची संबंधित यंत्रणेने तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वाहनचालकाची पात्रता आणि वाहनाची स्थिती याबाबतही आवश्यक चौकशी करण्यात यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
भैरोबा मंदिर परिसरातील रस्ता हा गावकऱ्यांसाठी महत्त्वाचा मार्ग असून येथे नागरिक, दुचाकीस्वार तसेच पशुधनाची सतत वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. मंदिर परिसरात वेगमर्यादेचे फलक लावावेत आणि वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या अपघातामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने या परिसराकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

No comments: