राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत नाविन्या लोहार व आराध्या कांबळे यांची सुवर्ण कामगिरी.
राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत नाविन्या लोहार व आराध्या कांबळे यांची सुवर्ण कामगिरी.
-----------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------------
महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशन व विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे दि. 02 व 03 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग युथ गेम्स स्पर्धेत कोल्हापूरच्या दोन युवा नेमबाजांनी सुवर्ण यश संपादन करत आपली प्रतिभा सिद्ध केली.
या स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील ओपन साइट रायफल (मुली) विभागात कु. नाविन्या श्रीपाद लोहार (रा. कळंबा, कोल्हापूर) हिने ४०० पैकी ३४६ गुणांची उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तसेच १४ वर्ष वयोगटातील एअर पिस्टल (मुली) विभागात कु. आराध्या अक्षय कांबळे हिने ४०० पैकी ३५१ गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
राज्यभरातून अनेक नेमबाज खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी अचूक लक्ष्यभेदन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ही दोन्ही खेळाडू सध्या स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॲकॅडमी, कोल्हापूर येथे नियमित सराव करत आहेत. त्यांना दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक, उपसंचालक, सेक्रेटरी व जॉइंट सेक्रेटरी यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रशिक्षक अक्षय मुळीक व प्रथमेश नरके यांचे विशेष प्रशिक्षण लाभले. तसेच पालक श्रीपाद लोहार व अक्षय कांबळे यांचे मोलाचे प्रोत्साहन त्यांना मिळाले.
“कष्ट, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर नाविन्या लोहार व आराध्या कांबळे यांनी राज्यस्तरावर सुवर्ण यश मिळवून कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचा मान उंचावला असल्याचे मत पालक अबोली लोहार यांनी व्यक्त केले.
या सुवर्ण यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची नोंद झाली असून भविष्यातही या नेमबाजांकडून आणखी उज्ज्वल कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments: