सावळीमध्ये अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक! ‘माझ्यासोबत चल, नाहीतर जीवे मारीन’; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल.
सावळीमध्ये अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक! ‘माझ्यासोबत चल, नाहीतर जीवे मारीन’; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल.
सावळी | सांगली
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सावळी येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचा हात धरून फिरायला चल, असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अनुराग ऊर्फ सोन्या सदामस्त (रा. सावळी, ता. मिरज, जि. सांगली) याच्याविरुद्ध एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास शहालुल्ला महानगर क्रमांक १, सावळी येथे फिर्यादी यांची १५ वर्षीय मुलगी घरासमोरील अंगणात अभ्यास करत बसली होती. यावेळी संशयित आरोपी तिच्याजवळ आला. ‘तू मला आवडतेस, माझ्या गाडीवर बस, आपण फिरून येऊ,’ असे म्हणत त्याने मुलीचा हात धरला. मुलीने नकार दिल्यानंतर आरोपीने कथितरीत्या कोयता काढून ‘माझ्यासोबत चल, नाहीतर तुला इथेच मारून टाकतो,’ अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ७८, ७९ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ मधील कलम ११(४) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय घाडगे साहेब करीत आहेत.

No comments: