दीड महिन्यांपासून बेपत्ता; राधानगरी पोलिसांच्या तत्परतेने कुटुंबीयांशी सुखरूप पुनर्भेट!
दीड महिन्यांपासून बेपत्ता; राधानगरी पोलिसांच्या तत्परतेने कुटुंबीयांशी सुखरूप पुनर्भेट!
डायल ११२ च्या माहितीवरून पोलिसांची तातडीची धाव; केळोशी खुर्दमध्ये माणुसकीचे दर्शन.
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
राधानगरी : गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या बापू अंकुश शेंडगे यांची राधानगरी पोलिसांच्या तत्परतेमुळे अखेर आपल्या नातेवाइकांशी सुखरूप भेट घडली. पोलिसांची सतर्कता, डायल ११२ यंत्रणेचा प्रभावी वापर आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राधानगरी तालुक्यातील केळोशी खुर्द येथे एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती डायल ११२ द्वारे राधानगरी पोलीस ठाण्याला मिळाली. माहिती मिळताच पोलीस अंमलदार शहाजी भोसले आणि विकास मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी संबंधित व्यक्तीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपले नाव बापू अंकुश शेंडगे, रा. तारापूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर असे सांगितले. त्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांच्या मदतीने आणि स्थानिक बीट अंमलदाराच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी बापू शेंडगे हे गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले.
पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केळोशी खुर्दच्या पोलीस पाटील शुभांगी सावंत आणि त्यांचे पती साताप्पा सावंत यांच्या सहकार्याने बापू शेंडगे यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर दि. २४ ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजता त्यांचे चुलत भाऊ दत्तात्रय शेंडगे, बहीण पल्लवी दळवे आणि भाऊजी धनाजी दळवे यांच्या ताब्यात त्यांना सुखरूप देण्यात आले.
पोलिसांची तत्परता, ग्रामस्थांचे सहकार्य आणि समन्वयातून हरवलेल्या व्यक्तीची कुटुंबीयांशी भेट घडली. दीड महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपल्याने नातेवाइकांनी राधानगरी पोलिसांसह सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले.
या घटनेतून पोलिसांची सतर्कता आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

No comments: