Header Ads

सांगली हादरली! गोकुळनगरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून

 सांगली हादरली! गोकुळनगरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून

धारदार शस्त्रांनी चेहरा, छाती, पोट-पाठीवर सपासप वार; गौरव सर्जे रक्ताच्या थारोळ्यात.

------------------------

राजू कदम.

-------------------------

सांगली : शहरातील गोकुळनगर परिसरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या थरारक खुनाच्या घटनेने सांगली शहर हादरले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गौरव सदानंद सर्जे (वय २५, रा. नवीन वसाहत, सांगली) याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला. सायंकाळी सुमारे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव सर्जे हा गोकुळनगर परिसरात असताना काही हल्लेखोरांनी त्याला गाठले. सुरुवातीला त्यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी गौरववर अचानक हल्ला चढवला.

या हल्ल्यात गौरवच्या चेहरा, छाती, पोट आणि पाठीवर गंभीर वार करण्यात आले. हल्लेखोरांनी सपासप वार केल्याने गौरव गंभीर जखमी होऊन घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

जुन्या खुनाच्या वादातून हल्ला?

गौरव सर्जे याच्यावर यापूर्वी मारामारीसह काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रात झालेल्या एका तरुणाच्या खुनाच्या प्रकरणात गौरवचा भाऊ मुख्य संशयित आरोपी असल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर जुन्या खुनाच्या वादातून किंवा बदला घेण्याच्या कारणातून गौरवची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण आणि हल्लेखोर कोण होते, याचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार आहे.

टोळीयुद्ध भडकण्याची भीती

गोकुळनगरातील या थरारक हत्येमुळे सांगली शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. जुन्या वैमनस्यातून हा खून झाला असल्यास त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असून, सांगलीत पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी आणि गौरवच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास केला जात असून, हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

No comments:

Powered by Blogger.