क्षणात होत्याचे नव्हते झाले! पुलावरील संरक्षण कठडा तोडून तवेरा ओढ्याच्या पात्रात एमएच ०४ ईएफ ९३०६ क्रमांकाच्या तवेरा गाडीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर, दोघे किरकोळ जखमी
क्षणात होत्याचे नव्हते झाले! पुलावरील संरक्षण कठडा तोडून तवेरा ओढ्याच्या पात्रात.
एमएच ०४ ईएफ ९३०६ क्रमांकाच्या तवेरा गाडीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर, दोघे किरकोळ जखमी.
-------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
संस्कार कुंभार
-------------------------
भरधाव वेग, क्षणार्धात सुटलेले नियंत्रण आणि त्यानंतर झालेला भीषण अपघात... तावडे हॉटेलजवळ घडलेल्या या दुर्घटनेत एका युवकाला आपला जीव गमवावा लागला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. एमएच ०४ ईएफ ९३०६ क्रमांकाची तवेरा गाडी पुलावरील संरक्षण कठडा तोडून थेट खाली ओढ्याच्या पात्रात कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, एमएच ०४ ईएफ ९३०६ क्रमांकाची तवेरा गाडी तावडे हॉटेलकडून कोल्हापूरच्या दिशेने येत होती. वाहन भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीने पुलावरील संरक्षण कठड्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कठडा तुटून वाहन थेट पुलाखालील ओढ्याच्या पात्रात कोसळले.
या भीषण अपघातात दुर्गेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. दुर्गेश हा मूळचा कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती समोर आली असून सध्या तो कावळा नाका, माकड वसाहत, कोल्हापूर येथे वास्तव्यास असल्याचे समजते. अपघाताची तीव्रता इतकी होती की तवेरा वाहनाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.
अपघातात रोहित जोंधळे, रोहित माने आणि अर्जुन चौगुले हे जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून दोघांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस कर्मचारी तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे, दीपक जाधव व वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ बचावकार्य राबवत जखमींना रुग्णालयात हलविले.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शाहूपुरी पोलीस पुढील तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments: