Header Ads

वळीवडेच्या रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! लाखमोलाची पर्स सुरक्षित परत; सर्वत्र कौतुक

 वळीवडेच्या रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! लाखमोलाची पर्स सुरक्षित परत; सर्वत्र कौतुक.



गांधीनगर | प्रतिनिधी

आजच्या काळात प्रामाणिकपणाची जिवंत उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतात. मात्र वळीवडे येथील रिक्षाचालक गोरख दत्ता इंगवले यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. रिक्षेत विसरलेली सोन्याचे गंठण, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स त्यांनी सुखरूप मालकिणीपर्यंत पोहोचवली.

भुयेवाडी येथील सारिका सचिन सुतार या २२ ऑगस्ट रोजी गांधीनगर येथे खरेदीसाठी आल्या होत्या. परतीच्या प्रवासात तावडे हॉटेल स्टॉपवर उतरल्यानंतर त्यांची पर्स रिक्षेतच राहिल्याचे लक्षात आले. पर्समध्ये एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, ५०० रुपये रोख, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड होते.

सारिका सुतार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, रिक्षाचालक गोरख इंगवले यांना पर्स मिळाल्यानंतर त्यांनी आधार कार्डवरील पत्त्यावरून संपर्क साधत पर्स सुरक्षित असल्याची माहिती दिली.

मंगळवारी गांधीनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम व कर्मचारी सचिन सांवत यांच्या उपस्थितीत गोरख इंगवले यांनी पर्समधील सर्व साहित्य जसेच्या तसे सारिका सुतार यांच्याकडे सुपूर्द केले.

या प्रामाणिक कृत्यामुळे रिक्षाचालक गोरख इंगवले यांचे नागरिकांसह गांधीनगर पोलिसांनीही कौतुक केले असून, त्यांच्या प्रामाणिकपणाची परिसरात चर्चा रंगली आहे.

No comments:

Powered by Blogger.