निलेश गडदेच्या एन.जी. ग्रुपवर पुन्हा मोक्क्याचा प्रहार, जतच्या गुन्ह्यात नऊ आरोपींवर मोक्का, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची मंजुरी
निलेश गडदेच्या एन.जी. ग्रुपवर पुन्हा मोक्क्याचा प्रहार, जतच्या गुन्ह्यात नऊ आरोपींवर मोक्का, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची मंजुरी.
सांगली : जत येथील खंडणी आणि गोळीबार प्रकरणात निलेश गडदे याच्या नेतृत्वाखालील कथित एन.जी. ग्रुपच्या नऊ आरोपींवर मोक्का लागू करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळीच्या अडचणी वाढल्या आहेत. जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खंडणी व फायरींग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील टोळीप्रमुख निलेश विठोबा गडदे (वय २७, रा. वाघमोडेनगर, कुपवाड), सॅन्डी ऊर्फ संदेश रामचंद्र घागरे (वय २३, रा. चाणक्य चौक, कुपवाड), अभिषेक जितेंद्र भोरे (वय २३, रा. जुना मिरज रोड, कुपवाड), दाजी राजाराम गडदे (वय ३८, रा. चाणक्य चौक, कुपवाड), अजित आबासाहेब दुधाळ (वय ३६, रा. अष्टविनायकनगर, कुपवाड), संभा ऊर्फ सुकुमार भागाप्पा माने (वय ३७, रा. बाज, ता. जत), किरण शंकर लोखंडे (वय २५, रा. वाघमोडेनगर, कुपवाड), मलिक सलीम शेख (वय २६, रा. दत्तनगर, बामणोली, कुपवाड) आणि राजेंद्रसिंग बडवानीसिंग टकराना ऊर्फ पाजी (रा. उमराठी, पोस्ट चलवाडी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. राजेंद्रसिंग टकराना हा परागंदा असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलीस तपासानुसार, या टोळीने २०१७ ते २०२६ या कालावधीत सांगली, मिरज, कुपवाड एमआयडीसी, महात्मा गांधी चौक, जत, संजयनगर आणि आष्टा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गुन्हे केल्याचा आरोप आहे. आर्थिक फायदा मिळवणे आणि परिसरात वर्चस्व निर्माण करणे, या उद्देशाने दहशत व हिंसाचाराचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. खंडणीची मागणी, जीवे मारण्याच्या धमक्या, गंभीर दुखापत, अपहरण, बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगणे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे आरोप या टोळीवर आहेत.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी केला. मोक्का कायद्यांतर्गत वाढीव कलमे लागू करण्यासाठी सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता राजेश मडके यांचा अभिप्राय घेण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केला. पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाचे अवलोकन करून तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर त्यांनी नऊ आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यातील कलमांचा समावेश करून पुढील तपास करण्यास मंजुरी दिली.
या कारवाईवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शन व देखरेख होती. मुख्य आरोपी कायदेशीर तांत्रिक बाबींच्या आधारे कारवाईतून सुटण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मोक्क्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरखोले यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा टोळ्यांवर लक्ष ठेवून कठोर कायदेशीर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

No comments: