एमआयडीसी कुपवाडमध्ये अॅल्युमिनियम पॅटर्न चोरी प्रकरण उघड; चौघांना अटक.
एमआयडीसी कुपवाडमध्ये अॅल्युमिनियम पॅटर्न चोरी प्रकरण उघड; चौघांना अटक.
----------------------------------
कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------
एमआयडीसी कुपवाड परिसरातील कंपनीमधून सुमारे ७ लाख रुपयांचे अॅल्युमिनियम पॅटर्न चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत चोरीचा माल व गुन्ह्यात वापरलेला टेम्पोसह एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६७/२०२५ नुसार बीएनएस कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. फिर्यादी राकेश परशुराम महाजन (वय ३८, रा. बामनोली दत्तनगर, ता. मिरज) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीच्या ‘माईन्ड फ्लो’ कंपनीच्या कंपाऊंडमधील मोकळ्या जागेत ठेवलेले सुमारे ५० नग (अंदाजे १२५० किलो) अॅल्युमिनियम पॅटर्न अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडवरून उडी मारून चोरी केले होते.
दरम्यान, गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रविण मोहिते यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीतील अॅल्युमिनियमचे पार्ट विक्रीसाठी कुपवाडहून मिरजकडे नेले जात आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने महाबळ मेटल ते मधुसुधन डेअरी रोडवर अजंठा सिमेंट फॅक्टरी जवळ सापळा रचला.
यावेळी संशयित निळ्या रंगाचा तीन चाकी टेम्पो (एमएच ०९ बीसी १२५८) थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये चोरीस गेलेले अॅल्युमिनियम पॅटर्न आढळून आले. चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव निवास सुंदर घाडगे (वय ३१, रा. प्रकाशनगर, कुपवाड) असे सांगितले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांसह कंपनीमधील अॅल्युमिनियम पार्ट चोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात पोलिसांनी
१) निवास सुंदर घाडगे (रा. प्रकाशनगर, कुपवाड)
२) गंगा गणेश गोसावी (रा. प्रकाशनगर, कुपवाड)
३) आकाश ज्ञानू गोसावी (रा. रविवार पेठ, माधवनगर)
४) विकास ज्ञानू गोसावी (रा. रविवार पेठ, माधवनगर)
यांना अटक केली आहे.
तर भरत उर्फ बंटी नामदेव जाधव (रा. माधवनगर) व बंटी (रा. वाल्मीकीनगर) हे दोघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारयकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा व सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात, अनिरुद्ध गयारी तसेच गुन्हे शोध पथकाने केली.
पोलिसांनी चोरीस गेलेले सुमारे ७ लाख रुपयांचे अॅल्युमिनियम पॅटर्न व २ लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

No comments: