ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेलेल्या युवकाची आत्महत्या; कर्जबाजारीपणा व नैराश्याचा शेवट. शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; कोरोची गावात हळहळ
ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेलेल्या युवकाची आत्महत्या; कर्जबाजारीपणा व नैराश्याचा शेवट. शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; कोरोची गावात हळहळ.
------------------------शशिकांत कुंभार.
----------------------
शहापूर :
कोरोची गावातील एसटी स्टँड परिसरात ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य मिलिंद कोळी (वय २४, रा. एसटी स्टँड मागे, कोरोची) असे मयत तरुणाचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आदित्यने आपल्या घरातील लोखंडी खांबाला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर कोरोची गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून त्यात ऑनलाईन गेम्सच्या नादात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या व्यसनामुळे आदित्य कर्जबाजारी झाला होता. तसेच, कर्जाच्या ओझ्यामुळे तो मानसिक तणाव आणि नैराश्यात होता. परिस्थिती हाताळता न आल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
माहितीनुसार, ऑनलाईन गेम्सच्या व्यसनामुळे त्याने स्वतःचा सुमारे ३५ हजार रुपयांचा मोबाईलही विकला होता. मात्र, आर्थिक अडचणी आणि वाढते कर्ज यामुळे तो अधिकच खचला होता.
या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे ऑनलाईन गेम्सच्या वाढत्या व्यसनाबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments: