भद्रकाली पान शॉपच्या आड सुरू होता गुटख्याचा काळाबाजार; करवीर पोलिसांच्या धाडीत ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त..
भद्रकाली पान शॉपच्या आड सुरू होता गुटख्याचा काळाबाजार; करवीर पोलिसांच्या धाडीत ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त.
कोल्हापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याचा बेकायदेशीर साठा करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हळदी गावातील ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पथक हद्दीत गस्त घालत असताना हळदी गावातील मुख्य चौकात असलेल्या भद्रकाली पान शॉपच्या पाठीमागील पार्टिशनच्या खोलीत एक व्यक्ती प्लास्टिकच्या पोत्यातून गुटखा आणि तंबाखूच्या पुड्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले.
चौकशीत त्याचे नाव खंडेराव मनोहर नाईक (वय ४५, रा. श्री स्वामी समर्थ गल्ली, हळदी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे निष्पन्न झाले. त्याच्याकडील दोन प्लास्टिकच्या पोत्यांमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत ४७ हजार ८०० रुपये इतकी आहे.
सदर आरोपीसह जप्त मुद्देमाल करवीर पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस १९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, सुहास पोवार तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
हळदी गावात उघड झालेल्या या गुटखा रॅकेटमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून करवीर पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत आहे.

No comments: