गुप्त माहिती ठरली अचूक; चोरटी महिला पोलिसांच्या जाळ्यात
गुप्त माहिती ठरली अचूक; चोरटी महिला पोलिसांच्या जाळ्यात.
सांगली प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चोरटी महिलेला अटक करून दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. आरोपी महिलेकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करून संशयितांवर लक्ष ठेवण्यात येत होते.
सांगली विभागात गस्त घालत असताना पोहेकॉ अरुण पाटील व पोकों सुरज थोरात यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक चोरटी महिला आष्टा बसस्थानक परिसरात फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तत्काळ परिसरात सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले.
महिला पोलीस अंमलदार सपना गराडे यांनी पंचासमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये संबंधित महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम आढळून आली. चौकशीत तिने आपले नाव कविता सतीश काळे (वय ४६, रा. कनान नगर झोपडपट्टी, नागाळा पार्क, कोल्हापूर) असे सांगितले.
अधिक चौकशी केली असता तिने सुमारे दोन महिन्यांपूर्वी विटा एस.टी. बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर विटा पोलीस ठाण्याच्या अभिलेखांची पडताळणी केली असता संबंधित चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी महिला व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पोहेकॉ उत्तम माळी पुढील तपास करीत आहेत.
एलसीबीच्या सतर्क कारवाईमुळे दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments: