गर्दीतून सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला; मद्यधुंद वाहनचालकाविरुद्ध कारवाई.
गर्दीतून सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला; मद्यधुंद वाहनचालकाविरुद्ध कारवाई.
-------------------------------
कोल्हापूर, दि. 18 : गांधीनगर परिसरात भररस्त्यात गोंधळ घालून एका तरुणास मारहाण केल्याच्या प्रकारात हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाच धक्काबुक्की करून त्यांच्या गणवेशावरील शोल्डर स्ट्रिप तोडल्याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल दिलीपराव भेंडाळे (वय 39, रा. कंदलगाव, ता. करवीर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार संदीप विठ्ठल जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप जाधव हे बुधवारी (दि. 17) शेंडा पार्क येथे केमिकल तपासणीचा अहवाल जमा करण्यासाठी जात असताना पवार मळा परिसरातील किनारा साडी सेंटरसमोर रस्त्यावर एक व्यक्ती वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे तसेच एका युवकास मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तेथे जमलेल्या नागरिकांकडून संबंधित व्यक्तीस मारहाण होत असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयिताने पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाऊन कॉलर पकडली, धक्काबुक्की केली आणि गणवेशावरील स्टार असलेली शोल्डर स्ट्रिप ओढून तोडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातील इलेक्ट्रिक दुचाकी, एक धारदार लोखंडी सुरी आणि मद्याची बाटली जप्त केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments: