जलप्रदूषण टाळण्यासाठी चंदगड तालुक्यातील रामपूर येथे आदर्श उपक्रम; कै. विठ्ठलराव पाटील यांच्या इच्छेनुसार अस्थी विसर्जनाऐवजी शेतातील झाडांना दिली राख!.
जलप्रदूषण टाळण्यासाठी चंदगड तालुक्यातील रामपूर येथे आदर्श उपक्रम; कै. विठ्ठलराव पाटील यांच्या इच्छेनुसार अस्थी विसर्जनाऐवजी शेतातील झाडांना दिली राख!.
------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी-: मृत्यूनंतर अस्थी किंवा राख नदीमध्ये विसर्जित करण्याची पारंपरिक प्रथा बाजूला सारत, चंदगड तालुक्यातील रामपूर येथील ज्येष्ठ सामाजिक व राजकीय नेते दिवंगत विठ्ठलराव गुंडू पाटील यांच्या कुटुंबाने समाजात एक नवा आणि पर्यावरणपूरक आदर्श घालून दिला आहे. कै. विठ्ठलराव पाटील यांचे नुकतेच निधन झाले. पारंपरिक पद्धतीने नदीचे पाणी प्रदूषित करण्याऐवजी, त्यांच्या अंतिम इच्छेचा आदर करत पाटील कुटुंबियांनी त्यांची राख नदीत विसर्जित न करता शेतातील झाडांना अर्पण केली.कै. विठ्ठलराव गुंडू पाटील हे चंदगड तालुक्यातील एक मातब्बर सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय नेते होते. त्यांनी दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, तालुका शेतकरी संघ व वाहतूक संघाचे संचालक म्हणून दीर्घकाळ काम पाहिले होते. तसेच जय हनुमान दूध डेअरीचे ते संस्थापक चेअरमन होते. स्थानिक पातळीवर तब्बल ५० वर्षे ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच म्हणून काम पाहताना त्यांनी रामपूर गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले होते.सहकार, शिक्षण आणि राजकीय क्षेत्रात एवढा मोठा दबदबा असूनही विठ्ठलराव पाटील हे अत्यंत निसर्गप्रेमी आणि पुरोगामी विचारांचे होते. "माझ्या मृत्यूनंतर पारंपरिक अंधश्रद्धेला किंवा रूढीला थारा न देता, माझी राख शेतातील झाडांना द्यावी; जेणेकरून मी निसर्गाच्या आणि पिकांच्या रूपाने नेहमी माझ्या शेतात जिवंत राहीन," अशी इच्छा त्यांनी आधीच बोलून दाखवली होती.दुःखाच्या या कठीण प्रसंगातही त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी या अंतिम इच्छेचे तंतोतंत पालन केले. अंत्यसंस्कारानंतर जमा झालेली सर्व राख गोळा करून ती शेतात नेण्यात आली. तिथे माती आणि सेंद्रिय खतामध्ये ही राख शास्त्रोक्त पद्धतीने मिसळून शेतातील मोठ्या झाडांच्या मुळांना खत म्हणून देण्यात आली.अस्थी विसर्जनामुळे नद्यांमध्ये होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याच्या कुटुंबाने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. रामपूर आणि संपूर्ण चंदगड परिसरात या पुरोगामी निर्णयाचे मोठे कौतुक होत असून, बदलत्या काळाची गरज ओळखून घेतलेला हा निर्णय समाजाला एक नवी दिशा देणारा ठरेल, अशा भावना सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.

No comments: